स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. परंतू, एलईडी टीव्हीचा स्फोट झाल्याचे तुम्ही ऐकलेय का? उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी एका घरातील एलईडी टीव्हीचा स्फोट झाल्याने टीव्ही पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू जाला असून घरातील तीन जण जखमी झाले आहेत.
मोबाईलमध्ये बॅटरी असल्याने तिचा स्फोट होतो, हे सर्वांना माहिती आहे. परंतू, टीव्हीचा स्फोट तो देखील पाहणाऱ्याचा जीव घेणारा हे खूपच भयानक आहे. यामुळे पोलिसही चक्रावले असून चौकशी सुरु केली आहे. गाझियाबादच्या तुलसी निकेतनच्या हर्ष विहार भागात ही घटना घडली आहे. दुपारी दोनच्या सुमारासची ही घटना आहे. या घटनेत तरुणाची आई, वहिणी देखील जखमी झाली आहे. त्यांना दिल्लीच्या जीबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
टीव्ही भिंतीवर लावलेला होता. जमिनीवर बसून १६ वर्षांचा मुलगा टीव्ही पाहत होता. त्याच्यासोबत त्याची आई, मित्र आणि भावाची पत्नी असे तिघे तिथेच होते. अचानक जोरदार आवाज झाला. यामुळे शेजारचे लोक धावत घरात आले. घरात धुराचे साम्राज्य होते. तरीदेखील लोकांनी धाडस करून घरात गेले तर जखमी लोक त्यांच्याकडे मदत मागत होते. पोलिसांना सूचना देऊन जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.
टीव्हीमध्ये स्फोट कसा होऊ शकतो...या घटनेनंतर अनेकांना टीव्हीमध्ये एवढा मोठा स्फोट कसा होऊ शकतो असा प्रश्न पडला आहे. एलईडी टीव्हीचा स्फोट होऊ शकतो, असे इलेक्ट्रॉनिक तज्ञांनी सांगितले. वीज पुरवठ्यामध्ये समस्या असू शकते. हाय व्होल्टेज येत असल्यामुळे हे होऊ शकते. LED च्या अंतर्गत भागांमध्ये कोणतीही समस्या नसते. त्यामुळे स्टॅबिलायझर वापरल्यास अशा प्रकारच्या घटना टाळता येतील.