गाजियाबाद – उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथे मुरादनगर खैराजपूर गावात राहणाऱ्या मुरसलीम हत्याकांडात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी मुरसलीमच्या हत्येसाठी त्याची प्रेयसी आणि नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली. मुरसलीमला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. प्रेयसीला पळवून नेण्याची त्याची कल्पना होती. ११ ऑगस्टला तो प्रेयसीला घरातून पळवून नेण्यासाठी आला तेव्हा प्रेयसीनं पळून जाण्यास नकार दिला. त्यानंतर जे घडलं त्याने प्रेयसीला धक्का बसला.
प्रेयसीनं पळण्यास नकार दिल्याने प्रियकर मुरसलीम हताश झाला. त्याने दुपट्ट्याच्या सहाय्याने प्रेयसीच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर भीतीपोटी प्रेयसीनं मुरसलीमचा मृतदेह एक खड्डा काढून त्यात पुरला. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून त्यावर मीठही टाकलं होतं. चौकशीवेळी प्रेयसीला हे कसं सुचलं असा प्रश्न केला असता तिने शेजारील घरात एकदा सावधान इंडिया शो पाहिला होता. त्यात मृतदेह खड्ड्यात दफन करताना दृश्य होतं. घटनेनंतर हेच दृश्य माझ्या डोक्यात आलं असं प्रेयसीने म्हटलं.
खैराजपूर गावात शेतकरी कुटुंबात मुरसलीमचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबात आई संजीदा, भाऊ अंसार, वाजिद, अफजल, विलाल, आसिफ, अमदज आणि तीन बहिणी होत्या. मुरसलीम हा १९ वर्षाचा असून तो मजुरी करायचा. ११ ऑगस्टला सकाळी १०.३० च्या सुमारास मुरसलीमच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यानंतर काही वेळातच येतो म्हणून तो घराच्या बाहेर निघून गेला. रात्रीपर्यंत तो घरात परतला नाही म्हणून कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध सुरु केला. अनेक प्रयत्नानंतरही मुरसलीमचा शोध न लागल्याने घरच्यांनी अखेर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली.
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. मुरसलीमच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स चेक करण्यात आले. मंगळवारी ग्रामस्थ गावच्या आसपास शेतात त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर पोलीस प्रेयसीच्या घरी पोहचले. त्याठिकाणी संशयावरुन पोलिसांनी प्रेयसीची चौकशी केली. तेव्हा घराच्या अंगणात दोन फूट खड्ड्यात मुरसलीमचा मृतदेह ठेवल्याची पोलिसांना माहिती मिळाली.
कुल्फीवाल्याला विकलेल्या सिमने खुलासा झाला
पोलिसांच्या माहितीनुसार, आम्ही मुरसलीमचा शोध घेत असताना त्याच्या मोबाईलचे सिम एक्टिव्ह झाल्याचं दिसलं. त्याचे लोकेशन बागपत येथील ढिकौली इथं असल्याचं कळालं. पोलिसांनी या नंबरवर कॉल केला असता आईस्क्रीम विक्रेता कपिलकडे ते सिम असल्याचं आढळलं. चौकशी केली असता खैराजपूर गावात आईस्क्रिम विकण्यासाठी गेलो असता एका युवतीने आईस्क्रीम खरेदी करून ५०० रुपयांची नोट दिली त्यात हे सिम होतं असं त्याने सांगितले.
आईस्क्रिम पैसे घेतल्यानंतर उरलेले पैसे त्याने युवतीला परत केले. संध्याकाळी घरी येऊन पैसे मोजताना ही ५०० ची नोट आढळली. त्यात ते सिम होते. त्यानंतर आईस्क्रीमवाल्याने युवतीची ओळख पटवली. तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. गेली २ वर्ष या मुरसलीम आणि युवतीमध्ये प्रेमसंबंध होते. प्रकरणानंतर युवतीचा भाऊ, आई, बहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर प्रेयसीने घडलेला प्रकार सांगितला. परंतु अद्याप मृताचं कारण अस्पष्ट आहे. पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावर पुढील कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलं आहे.