नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. मित्राच्या मोबाईलमध्ये आपल्या बहिणीचा फोटो असून तो डिलीट करत नसल्याच्या कारणावरून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आरोपीच्या बहिणीचे काही फोटो होते. वारंवार सांगूनही मित्र ते फोटो डिलीट करत नव्हता. त्यामुळेच आरोपीने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय रंजन झा आणि सूरज शुक्ला यांची मैत्री होती. एकमेकांच्या घरी त्यांचं येणं-जाणं असायचं. रंजनच्या मोबाईलमध्ये सूरजच्या बहिणीचे काही फोटो होते. ही बाब सूरजच्या लक्षात येताच त्याने त्यावर आक्षेप घेतला आणि ते फोटो तातडीने डिलिट करण्याची मागणी केली. मात्र रंजनने त्याला नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि पुढे तो वाद विकोपाला गेला. त्यानंतर सूरजने रंजनवर चाकूचे वार केले. त्यात रंजन गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी रंजन झा याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी रंजनला मृत घोषित केलं. रंजनचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो नोकरी शोधत होता. तर सूरज हा त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. रंजनच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून सूरजवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत.
नात्याला काळीमा! जन्मदात्या आईची मुलीनेच केली हत्या: कारण वाचून बसेल मोठा धक्का; अशी झाली पोलखोल
हरियाणा फरीदाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलीनेच आपल्य़ा जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्राईम ब्रांचने या ब्लाईंड मर्डर केसचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणामुळे मुलीने आपल्या एका मित्राच्या मदतीने आईची हत्या केली आहे. अल्पवयीन मुलीला आपल्या मित्रासोबत राहायचं होतं. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र आई यामुळे खूश नव्हती. ती प्रेमप्रकरणामुळे नाराज झाली होती. म्हणून मुलीने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.