मीरा रोड - यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी मीरा-भाईंदर महापालिकेचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय न देता ठाणे न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर आर काकाणी यांनी सदर प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांकडे चालवण्याचे नमूद केले. त्यामुळे आता शुक्रवारी या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मे यांच्या कडे सुनावणी होणार आहे.
मीरा भाईंदरमधील १०२ कोटी रुपयांच्या यूएनसी घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी नव्याने तपास करत महापालिकेचे निवृत्त सहाय्यक नगररचनाकार सत्यवान धनेगावे वास्तुविशारद चंद्रशेखर लिमये व सध्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत भरत कांबळे या तिघांना अटक केली आहे. सदर आरोपी आठ दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत आहेत.
परंतु या घोटाळ्याचे मुख्य आरोपी दिलीप घेवारे यांना मात्र अटक करण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही. त्यातच बुधवार २३ जून रोजी ठाणे न्यायालयातील न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय न देता सदर प्रकरण अन्यत्र चालवण्याचे म्हटले होते.
वास्तविक १४ जून पासून १८ जून दरम्यान ४ वेळा काकाणी यांच्या समोर घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. १८ जून रोजी सुद्धा सुमारे तीन तासांच्या युक्तिवाद नंतर काकाणी यांनी २३ जून रोजी निर्णय देण्याचे म्हटले होते. परंतु सुरवाती पासूनच तक्रारदार आणि विशेष सरकारी वकिलांनी हरकत घेतली होती. तक्रारदार यांनी तर थेट मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या पर्यंत तक्रारी केल्या होत्या.