द्वारका – दिल्लीच्या द्वारका परिसरात एका ४१ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, या युवकाने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, यात आरोप होता की, एका महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा नोंद केला आहे, त्या महिलेकडून आणि तिच्या वडिलांकडून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे असा आरोप त्याने केला आहे.
या प्रकरणी द्वारका येथील डीसीपी एसके मीणा यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता द्वारका येथील व्यंकटेश्वर हॉस्पिटलमधून कॉल आला, दीपक सांगवान नावाच्या व्यक्तीने स्वत:ला गोळी मारली आहे, तो गोयल खुर्द येथील रहिवासी आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामुळे पुढील तपासासाठी पीएसआय अरविंद शौकीन यांना पाठवण्यात आले,
डीएसपीने सांगितले की, जेव्हा पोलिसांचा तपास सुरु झाला तेव्हा या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडल्याचं दिसून आलं, तो प्रकाराबाबत जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नव्हता, तथ्य तपासण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि चौकशी केली, तेव्हा जखमी युवकाच्या आईने पोलिसांना माहिती दिली, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण केले, घटनास्थळी एक पिस्तुल, दोन कारतूस आणि एक रिकामी कारतूस जप्त करण्यात आली, घटनेशी निगडीत सर्व गोष्टी पोलिसांनी जमा केल्या.
घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्या व्यक्तीने आरोप लावला होता की, रश्मी(नावात बदल) आणि तिचे वडील आनंद दत्त जे महावीर एन्क्लेवमध्ये राहतात, या लोकांनी मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडलं आहे, मी रश्मीला २ लाख रुपये दिले होते, त्यानंतर मुलीने ती रक्कम चेकद्वारे मला परत केली, परंतु हा चेक बाऊन्स झाला, त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले, कोर्टाचे समन्स मिळाल्यानंतर मुलीने आणि तिच्या वडिलांनी मला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. इतकचं नाही तर रश्मीने माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप करत माझ्याविरोधात तक्रार दिली, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं त्यांनी लिहिलं होतं.