हाथरस (उत्तर प्रदेश) : शिवण व कशिदाकामाचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून दिल्लीला घेऊन जाणाऱ्याच्या तावडीतून मुलीने (१७, रा. डोंगर, जिल्हा मांडला, मध्यप्रदेश) स्वत:ची सुटका करून घेतली, तीदेखील दोन-तीन दिवस पायी चालत. ती येथे आल्यावर तिला पोलिसांनी मदत केली.
ही मुलगी आई-वडिलांच्या परवानगीने इतर ११ मुलींसोबत दिल्लीला एक आठवड्यापूर्वी निघाली, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. मुलीने घटनाक्रम असा सांगितला- ‘‘आमचा सगळ््यांचा प्रवास सुरू झाल्यावर बसस्थानकाजवळच्या भाड्याच्या खोलीत आम्हाला ठेवण्यात आले. त्या व्यक्तीच्या हेतूंचा मला संशय आला व तेथून मी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली.’’
मुलगी दोन-तीन दिवस पायी चालून शनिवारी हाथरसला पोहोचली. बसस्थानकावर ती बसलेली आढळली व नंतर तिला हाथरसच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. इतर मुलींसोबत मला नेमके कोठे ठेवले होते त्या जागेचे नाव आठवत नसल्याचे तिने सांगितले. मुलीचे म्हणणे शहर मंडळ अधिकाºयाने नोंदवून घेऊन तिच्या पालकांना कळवल्याचे पोलीस अधीक्षक विनीत जैस्वाल यांनी सांगितले. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.