बॉयफ्रेंडच्या भितीने तरूणीने विहिरीत मारली उडी, घरात घुसून केली होती तिला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:16 AM2023-01-19T11:16:44+5:302023-01-19T11:17:02+5:30
MP Crime News : मंगळवारी इथे पाच तरूण एका कारमधून आले होते. त्यांच्याकडे चाकू आणि काठ्या होत्या. पाचपैकी दोन तरूण 17 वर्षीय तरूणीच्या घरात शिरले.
MP Crime News : मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांच्या मारहाणीनंतर 17 वर्षीय तरूणीने विहिरीत उडी मारली. गावातील लोकांनी कसंतरी तिला विहिरीतून बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सोबतच गावकऱ्यांनी मारहाण करत असलेल्या दोन तरूणांना पकडून पोलिसांना सूचना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांनी अटक केली.
ही घटना बिछुआ गावातील आहे. मंगळवारी इथे पाच तरूण एका कारमधून आले होते. त्यांच्याकडे चाकू आणि काठ्या होत्या. पाचपैकी दोन तरूण 17 वर्षीय तरूणीच्या घरात शिरले. त्यांनी तिला शिव्या दिल्या आणि नंतर मारहाण केली. तरूणी बचाव करत घराबाहेर पळाली.
यादरम्यान घराबाहेर उभे असलेले तीन तरूण तिचा पाठलाग करू लागले. तरूणीने त्यांच्यापासून वाचण्यासाठी जवळच्या विहिरीत उडी मारली. गावातील लोकांनी तिला उडी मारताना पाहिलं तर ते तिला वाचवण्यासाठी धावत गेले. त्यांनी तिला बाहेर काढलं. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिची स्थिती गंभीर असल्याने तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं.
सध्या तिची स्थिती स्थिर आहे. याप्रकरणी तरूणीच्या वडिलांनी तरूणांविरोधात तक्रार दाखल केली. तीन तरूण अजूनही फरार आहे. असं सांगण्यात आलं की, यातील एका तरूणासोबत तरूणीचं प्रेमप्रकरण सुरू होतं. पण पोलीस ही घटना तरूणी आणि तिच्या मित्रांमधील आपसातील वाद मानत आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितलं की, पीडित आणि आरोपी दोन्ही शाळेपासूनचे मित्र आहेत. आपसातील वादामुळे मारझोड झाली. तरूणीने विहिरीत उडी मारली होती. तिला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.