नवी मुंबई : वाशी येथील सेंट मेरी मल्टिपर्पज हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी ११ वर्षीय विद्यार्थिनी शनिवारी सकाळी शाळेच्या शौचालयात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. एक महिला शौचालय साफ करण्यासाठी गेली असता ही बाब उघड झाली. प्राथमिक तपासात या विद्यार्थिनीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. मुग्धा महेंद्र कदम असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती कोपरखैरणे येथे कुटुंबासह राहत होती.
मुग्धा ही शनिवारीही नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मधल्या सुट्टीनंतर सकाळी दहाच्या सुमारास ती तिसऱ्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये गेली. बराच वेळ झाला, तरी विद्यार्थिनी वर्गात परतली नाही म्हणून तिच्या वर्गमित्रांनी तिच्या अनुपस्थितीची माहिती वर्गशिक्षकांना दिली. परिस्थिती पाहून वर्गशिक्षकांनी मुग्धाचा शोध सुरू केला.
सफाई कर्मचारी नियमित साफसफाईसाठी तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात गेले. याचक्षणी त्यांना शौचालयाचा एक दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने शाळेतील शिक्षकांना परिस्थितीची माहिती दिल्याने शिक्षकांनी तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात धाव घेतली. दरवाजा तोडल्यानंतर त्यांना विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत आढळून आली. वेळ न घालवता शिक्षकांनी तातडीने मुग्धाला वैद्यकीय मदतीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिस तत्काळ शाळेच्या आवारात दाखल झाले. त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.