लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जोडीदाराच्या शोधात असताना, विवाह संकेतस्थळावरून तरुणासोबत ओळख झाली. संवाद वाढला. लग्नाचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात झाली. मात्र लग्नापूर्वीच होणारा नवरदेव साडेपाच लाखांचा गंडा घालून नॉट रिचेबल झाल्याने तरुणीला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ ओढावली. याप्रकरणीव्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.
गिरगाव परिसरात ३६ वर्षीय रेश्मा आईसोबत राहते. जून महिन्यात लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर तिने माहिती शेअर केली. त्यानंतर तिला मुलांच्या रिक्वेस्ट येत असताना, ४ सप्टेबर रोजी एकाचा व्हॉट्सअॅप संदेश धडकला. त्याने त्याचे नाव संदीप राऊत सांगून वाराणसीचा रहिवासी असल्याचे सांगितले. अमेरिकेत त्याची स्वत:ची कंपनी असल्याचे सांगितले.दोघांमध्ये संवाद वाढला. रेश्मानेही त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगविले. ७ सप्टेंबर रोजी त्याने ५७ हजार रूपयांच्या वस्तू खरेदी केल्याचे सांगितले. आणि ते कार्गोने पाठवत असल्याचे सांगून, लिंक पाठवली. गिफ्टचे फोटोही पाठविले.
त्यानंतर कुरियर कंपनीचा मेल धडकला. ८ तारखेला कुरियर आल्याचे सांगून, त्यासाठी आधी ५७ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार तिने पैसे भरले. पुढे दुसरा कॉल आला. त्यात पार्सलमध्ये पैसे असल्याचे सांगून, आणखीन दीड लाख भरण्यास सांगितले.
त्यानंतर वेगवेगळी कारणे देत तरुणीकड़ून ५ लाख ६४ हजार रुपये उकळले. पुढे आणखी ९ लाख रुपये भरावे लागणार असल्याचे सांगितले. तिने संदीपला पैसे नसल्याचे सांगताच त्याने विवाह संकेत स्थळावरील त्याचे अकाउंट डिलीट करण्यास सांगितले. तरुणीने भरलेल्या पैशांबाबत विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोबाइल बंद करून ठेवला.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार शनिवारी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.