प्रेमात अनेकदा असे निर्णय घेतले जातात ज्याचा पुढे त्रास होतो. एका महिलेच्या बाबतीत तेच घडले. ही महिला तिच्या वयाहून ८ वर्ष लहान असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली. हा युवक मॅकेनिक होता. एका बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये ३० वर्षीय मुलगी राहत होती. कुटुंबातील सदस्य तिला वारंवार फोन करत होते परंतु तिने फोन उचलला नाही. हे प्रकरण गोव्यातील आहे.
त्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीला फोन केला गेला, तो मुलीच्या घरची बेल वाजवत होता. वारंवार बेल वाजवूनही गेट उघडले नाही तेव्हा त्याने धक्का दिला. दरवाजा बंद नसल्याने तो उघडला. तो घरात जाऊन मुलीला आवाज देत होता. परंतु काहीच उत्तर येत नव्हते. तेव्हा त्याची नजर जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थेंबांकडे जाते. त्यानंतर तो तिच्या कुटुंबाला कळवतो.
कुटुंबातील लोक गोव्याला पोहचतात, त्यानंतर मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांना दिली जाते. ही मुलगी काय करत होती, कुठे काम करायची. या फ्लॅटमध्ये कधीपासून राहायला आलीय अशा प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कुटुंबाला कुणावर संशय आहे का विचारले असता त्यांनी २२ वर्षीय युवकाचे नाव घेतले. ज्याच्यासोबत मुलीची मैत्री होती. त्यानंतर पोलीस तपास सुरू होतो. तेव्हा कामाक्षी नावाच्या एका मुलीने गायब होण्यापूर्वी एका मुलाविरोधात तक्रार नोंदवल्याचे आढळते.
प्रकाश नावाचा मुलगा कामाक्षीला त्रास देत होता. त्यानंतर पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेतले. कामाक्षीने तक्रार केल्यानंतर तिला पुन्हा कधी भेटणार नाही असं ठरवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यांनी प्रकाशचे कॉल डिटेल्स तपासले. ज्यात त्याने शेवटचा कॉल कामाक्षीला केला होता ज्याचे लोकेशन तिच्याच घरी होते. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच त्याने रहस्य उलगडले.
प्रकाशने पोलिसांना सांगितले की, माझे आयुष्य सुरळीत सुरू होते. मी पेंटर आणि मॅकेनिक दोन्ही कामे करायचो. परंतु तेव्हा माझी भेट कामाक्षीसोबत होते. आम्ही एकमेकांना भेटत राहतो. हळूहळू आमच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. दोघे रिलेशनशिपमध्ये येतात. त्यानंतर काही काळाने कामाक्षी माझ्यापासून दूर राहू लागली. प्रकाशची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे हे तिला कळाले. तेव्हापासून तिने प्रकाशसोबत अंतर राखले. मात्र प्रकाशने कामाक्षीचा पाठलाग सोडला नाही.
जेव्हा प्रकाशने ऐकले नाही तेव्हा कामाक्षीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याबाबत प्रकाशला कळाल्यानंतर तो कामाक्षीच्या घरी गेला. तिच्याशी वाद घालू लागला. दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. तेव्हा प्रकाशने कामाक्षीवर चाकूने एकापाठोपाठ एक अनेक वार केले. त्यानंतर कामाक्षीचा मृतदेह महाराष्ट्रातील अंबोली घाटात दफन केला. प्रकाशनं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी कामाक्षीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.