नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हातील यमुना एक्स्प्रेस वेवरील सर्व्हिस रोडवर लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. हा मृतदेह दिल्लीतील आयुषी यादव या तरुणीचा असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीच्या आई आणि भावाने मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार आयुषीची हत्या ऑनर किलिंगचा प्रकार असून, तिच्या वडिलांनीच तिची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मथुरेतील राया परिसरात फेकला. आता पोलिसांनी आयुषीच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
याबाबत पोलीस अधिकारी एमपी सिंह यांनी सांगितले की, सदर तरुणी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी यमुना एक्स्प्रेस वेच्या सर्व्हिस रोडवर एका ट्रॉली बॅगमध्ये तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला होता. या तरुणीच्या डोक्यावर हात आणि पायांवर जखमांच्या खुणा होत्या. तसेच तिच्या छातीवरही गोळी झाडल्याची खूण होती. मथुरा पोलिसांना मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी आठ पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांची ही पथके तरुणीची ओळख पटवण्यासाठी गुरुग्राम, आग्रा, अलिगड, हाथरस, नोएडा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली होती.
पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणीची ओळख आयुषी यादव अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई आणि भावाकरवी तिची ओळख पटवली. त्यानंतर आता पोलीस या तरुणीची हत्या कुणी आणि का केली, याचा शोध घेत आहेत.
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजत यमुना एक्स्प्रेसवेच्या सर्विस रोडवर कृषी संशोधन केंद्राजवळ झाडांमध्ये लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये रक्ताने माखलेला एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिची गोळी झाडून हत्या केल्याचे दिसत होते. त्यानंतर तिचा मृतदेह बॅगमध्ये भरून फेकला होता.