मुंबई - घाटकोपरमध्ये घरात पाळलेल्या कुत्र्यासाठी चक्क पोटच्या मुलीने आईविरोधात तक्रार दाखल केली आहे. २४ वर्षीय स्नेहा निकम या मुलीने ही ४४ वर्षीय आईविरोधात तक्रार पंत नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.घाटकोपर पूर्व येथे तक्रारदार स्नेहा ही आई अश्विनी आणि भाऊ सिद्धेश यांच्यासोबत राहते. तिच्या आईचा वडापावचा स्टॉल असून स्नेहा तिच्या होणाऱ्या पतीचे पवई येथे असलेले जनरल स्टोअर सांभाळते. ३० जानेवारीला स्नेहाला दीड वर्षाचे कुत्र्याचे पिल्लू घाटकोपर पूर्वेकडील पॉप्युलर हॉटेलच्या बाजूला सापडले. त्याच्यानंतर स्नेहाने पिल्लू आजारी असल्याने डॉक्टरकडून उपचार करून घेतले आणि त्याला घरी घेऊन आली. या पिल्लाचं नाव तिने कुकी असं ठेवलं. सप्टेंबर महिन्यात स्नेहाच्या घरी गणपती आल्याने कुकीला घराच्या बाहेर दरवाजाला बांधून ठेवले. मात्र, ६ सप्टेंबर ५.३० वाजता स्नेहाला आईने सांगितले किक बेल्ट काढून इमारतीच्या खाली प्राथमिक विधी करायला गेली आहे.
नंतर लगेच स्नेहा तिचा शोध घेण्यासाठी बाहेर गेली. मात्र, कुकी सापडली नाही. त्यावर तिने इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आईनेच कुकीला सकाळी ४.१८ वाजताच्या सुमारास घेऊन इमारतीखाली गेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसलं. याबाबत स्नेहाने आईला विचारले असता आईने कुकीला रस्त्यावर सोडून दिले असल्याचे सांगितले. कुकीचा स्नेहाने खूप शोध घेतला ती सापडली नाही. म्हणून स्नेहाने याबाबत प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल ऍक्ट कलम ११ (अ), (१) अन्वये आईविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.