नवी दिल्ली – महरौली परिसरातून २५ मे रोजी एका युवतीचं अपहरण झालं. बेपत्ता युवतीचा भाऊ आणि आईने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अपहरणकर्त्याने बहिणीच्या फोनमधून व्हॉट्सअप कॉल करत खंडणीची मागणी केली. अपहरणकर्त्याने पीडित युवतीचे हातपाय बांधलेला एक फोटोही पाठवला. मुलीचे तोंड बांधलेले होते. तक्रारीनंतर दिल्ली पोलीस सक्रीय झाली. त्यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली.
प्रकरणाचा तपास करताना पोलीस सुरुवातीला पीडित कुटुंबाच्या घरी पोहचले. अखेर मुलगी किती वाजता घरातून बाहेर पडली होती? याचा शोध घेतला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर २४ मे रोजी संध्याकाळी ४.१५ मिनिटांनी मुलगी तिच्या घरातून बाहेर पडल्याचं दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले परंतु काहीच हाती लागलं नाही. दुसरीकडे अपहरणकर्त्याने मोबाईल बंद ठेवला होता परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून खंडणी मागत होता. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला तेव्हा फोनचं लोकेशन आग्रा येथे आढळलं. त्यानंतर पोलीस ज्याठिकाणाहून कॉल येत होता त्या लोकेशनला पोहचली. त्याठिकाणी हॉटेलमध्ये चौकशी केली असता मुलीने २४ रात्री चेक इन केल्याचं समोर आले.
पोलिसांनी हॉटेलचं सीसीटीव्ही पाहिले तेव्हा मुलगी रात्री एकटी आल्याचं दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या रुममध्ये जात मुलीला ताब्यात घेतले. मुलीची चौकशी केली तेव्हा पोलिसांना जे सत्य समजलं त्याने ते हैराण झाले. तपासावेळी मुलीने पोलिसांना सांगितले की, मला माझे छंद पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज होती. अनेक लोकांकडून मी कर्ज घेतली. ते फेडायचे होते. त्यासाठी अपहरण करण्याचा खोटा बनाव रचला. स्वत: आग्रा येथे पोहचली, फोटो काढून घरच्यांना पाठवले. इतकेच नाही तर व्हॉईस कॉलिंगच्या माध्यमातून आवाज बदलून कुटुंबाशी संवाद साधला. मुलीच्या तोंडून हा घटनाक्रम ऐकून पोलीस हैराण झाले. त्यांनी मुलीवर गुन्हा नोंदवत तिला अटक केली. हा संपूर्ण प्रकार पोलिसांनी मुलीच्या घरच्यांना सांगितला तेव्हा कुटुंबालाही धक्का बसला. पैशासाठी मुलीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला जो तिच्याच अंगलट आला.