व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. याचदरम्यान कपल एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात, मात्र हमीरपूरमधून पोलिसांना हैराण करणारी घटना समोर आली आहे. 12वीच्या विद्यार्थिनीकडून 21,000 रुपये लुटल्याच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांना अशी माहिती मिळाली ज्यामुळे ते चक्रावून गेले. तपासामध्ये चोरीची घटना प्रत्यक्षात खोटी असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी विद्यार्थिनीची कसून चौकशी केली असता सत्य समोर आलं. प्रियकराला भेटण्यासाठी तिने ही खोटी गोष्ट सांगितल्याचं म्हटलं आहे. तसेच प्रेमासाठी शाळेच्या फीसाठीचे सर्व पैसे खर्च केल्याचं सांगितलं.
हमीरपूर शहरातील ग्वाल टोली भागात मौदाहा भागातील एक मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. तिने शाळेची फी जमा करण्यासाठी तिच्या कुटुंबियांकडून 21 हजार रुपये घेतले होते. भरदिवसा शाळेची फी चोरीला गेल्याची माहिती विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितल्यावर कोतवाली पोलिसांना धक्काच बसला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. चोरीच्या घटनेबाबत सीओ सदर व कोतवाल दुर्ग विजय सिंह यांनी फौजफाट्यासह घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
विद्यार्थिनी व कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली. विद्यार्थिनीने पोलिसांसमोर खोटी कहाणीही सांगितली. फी बॅगेत ठेवून ती शाळेत जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होती, तेव्हा ग्वाल टोलीजवळ दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण आले आणि बॅग हिसकावून पळून गेले. दिवसाढवळ्या चोरीची घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी जवळपास बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांनी अनेक तास तपास सुरू ठेवला, मात्र चोरीच्या घटनेचा कोणताही सुगावा लागला नाही.
विजय सिंह यांनी सांगितले की, घटनेच्या माहितीवरून जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे शोधण्यात आले, मात्र या घटनेचा कोणताही सुगावा लागला नाही. विद्यार्थिनीची चौकशी केली असता तिने संपूर्ण हकीकत सांगितली. शाळेची फी जमा करण्याच्या बहाण्याने ही विद्यार्थिनी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी हमीरपूरला आली होती. प्रियकराच्या प्रेमात तिने शाळेची फीचे 21 हजार रुपये खर्च केले. नंतर घरच्यांच्या भीतीपोटी चोरी झाल्याची गोष्ट रचली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"