सातारा - बहिणीकडे आलेल्या बारावीत शिक्षण घेणाऱ्या मेव्हणीवर दाजीने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. हे प्रकरण कुणाला समजू नये यासाठी मेव्हणीने आत्महत्या करावी म्हणून तिच्यावर दबाव आणला. एवढ्यावरच न थांबता दाजीने तिच्याकडून चिठ्ठी लिहून घेतली. या चिठ्ठीत तिच्या वडिलांविरूद्ध मजकूर लिहून घेतला. परंतु पीडित युवतीने धाडस करून तक्रार दिल्याने दाजीचे कटकारस्थान उघडकीस आले.
पीडित युवती सातारा तालुक्यातील एका गावात बहिणीकडे शिक्षणासाठी आली होती. एकेदिवशी ती घरात एकटी असताना दाजीचा मानलेला अल्पवयीन भाऊ घरी आला. त्याने "तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझे बिनकपड्याचे फोटो मोबाईलवर पाठव नाहीतर मी तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन" अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून पीडित युवतीने त्याला फोटो पाठवले. मात्र काही दिवसानंतर हे फोटो त्या मुलाने दाजीला पाठवले. या फोटोवरून ब्लॅकमेल करून दाजीने रात्रीच्या वेळी मेव्हणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. झालेला प्रकार कोणास सांगितला तर तुझे फोटो सर्वांना पाठवेन अशी दाजीने धमकी दिली.
दाजीनं रचला कट
हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी दाजीने भलताच कट रचला. तू औषध पिऊन मर, नाहीतर तुला सोडणार नाही. तु औषध पिलीस तर कोणाला काहीही कळणार नाही असं म्हणून दमदाटी करून तिच्याकडून एक चिठ्ठी लिहून घेतली. त्या चिठ्ठीमध्ये वडिलांविरुद्ध काही मजकूर लिहून घेतला. जेणेकरून तिच्या आत्महत्येनंतर आपल्यावर काही येऊ नये याची दाजीने पुरेपूर काळजी घेतली होती. परंतु धाडस करून पीडित युवतीने हा घडलेला सारा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. अन्यथा युवतीला स्वत:च्या जीवाला मुकावे लागले असतेच शिवाय वडिलांनाही नाहक मनस्तापातून जावे लागले असते. नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना अशा चारभिंतीआड घडत असल्याने कुटुंबातील प्रत्येकानेच आपल्या मुलींबाबत सतर्क आणि सजग राहिले पाहिजे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक घटनांमध्ये पीडित तरूणी अथवा महिला आपल्या घरातील विश्वासू लोकांना आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करते, मात्र अशावेळी घरातलेच लोक तिला चुकीचे ठरवतात. तुझीच चूक असेल असे म्हणून तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. इथेच मोठी चूक घडत असून एकप्रकारे गुन्ह्याला प्रोत्साहित केल्यासारखा हा प्रकार असल्याचंही पोलीस सांगतात.