वसई - बांग्लादेशातून शेकडो मुलींची तस्करी कऱणाऱ्या आरोपी सैदुली पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्याच्याभोवती पुराव्यांचा फास आवळण्यासाठी पोलीस बांग्लादेशातील पिडीत मुलींचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविणार आहेत.
बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरुणींना फसवून भारतात वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्या टोळीचा प्रमुख मोहम्मद सैदुल मुस्लिम शेख (वय - ४०) याला गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाने अटक केली होती. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०१० पासून तो या गैरव्यवसायात होता. आतापर्यंत सैदुलच्या टोळीने हजारो मुलींना फसवून भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलल्याने समोर आले आहे. मागील एका वर्षातच त्याने ५०० मुलींना भारतात आणल्याचे पोलिसांनी सांगितले. सैदूल सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्यावर अधिकाअधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे. त्याने या व्यवसायात आणलेल्या काही मुलींची सुटका झाली असून त्या बांग्लादेशात आहेत. त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार घेतला जाणार आहे. बुधवारी नालासोपारा येथे ही व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. यामुळे सैदूलच्या कार्यपध्दतीची खरी माहिती पोलिसांना मिळणार आहे. या तपासासाठी पोलीस आता बांग्लादेश सीमेवरही जाणार आहेत.
सैदुल हा मुंबईत आल्यावर डोंबिवलीच्या मानपाडा येथील एका निवासी इमारतीत रहात होता. मात्र, त्याच्या या गैरकृत्याचा पत्ता कुणालाच नव्हता. तो सतत विमानाने प्रवास करत होता. मुली पुरविण्याचे त्याचे प्रमुख केंद्र हे पुणे येथे होते. पुण्यात त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.