उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे चिंचवड येथील मामा गँगच्या अट्टल गुन्हेगाराला मोठया शिताफरीने अटक केली. तसेच अपहरण केलेल्या १६ वर्षाच्या मुलीची सुटका गुन्हे अन्वेषण विभागाने करून अट्टल गुन्हेगारासह मुलीला पुणे चिंचवड पोलीसांच्या ताब्यात दिले.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांना पुणे चिंचवड येथील कुप्रसिध्द मामा गँगचा अट्टल गुन्हेगार सुरेश उर्फ रमेश उर्फ अण्णा खयप्पा मोची उर्फ अहिवले-२५ शहाड फाटक येथे अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीसह येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी साफळा रचून ताब्यात घेतले. अट्टल गुन्हेगार सुरेश उर्फ अण्णा अहिवले याने ३० ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची कबुली पोलीसांना दिली. सदर प्रकारची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे चिंचवड पोलीसांना दिल्यावर, पुणे चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने अन्वेषण विभागाकडे धाव घेतली. अन्वेषण विभागाने अट्टल गुन्हेगारासह अल्पवयीन मुलीला मंगळवारी त्यांच्या ताब्यात दिले.
पुणे चिंचवड पोलीस ठाण्यात सुरेश अहिवले या अट्टल गुन्हेगारावर भा. दं. वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुणे चिंचवड पोलीस ठाण्यासह शेजारील पोलीस ठाण्यात घरफोडी, जबरी चोरी, हाणामारी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. असी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्तकतेमुळे जबरीने पळून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका झाली. पुणे चिंचवड पोलीसांनी अल्पवयीन मुलीला आई व मामाच्या ताब्यात दिल्याचेही तरडे यांनी सांगितले.