सदानंद नाईक
उल्हासनगर : धक्कादायक : सोशल मीडियावरील इंस्ट्राग्रामवर मैत्री झालेल्या तरुणाने, अल्पवयीन मुलीला कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन, अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला २० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली.
उल्हासनगर पश्चिम मध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख मोबाईलवरील सोशल मीडियाच्या इंस्ट्राग्रामवर रिजवान शेख नावाच्या एका तरुणा सोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मुलीचा विश्वास संपादन केल्यावर, रिजवानने मैत्रीचा फायदा घेत बुधवारी रात्री कुटुंबाला ठार मारण्याचा मेसेज मुलीच्या मोबाईलवर पाठवून शहाड रेल्वे स्थानकानजीक भेटण्यासाठी बोलावले. याप्रकारने प्रचंड घाबरलेली मुलगी शहाड रेल्वे स्टेशन परिसरात भेटण्यासाठी गेली. त्यावेळी घाबरलेल्या मुलीचा गैरफायदा घेत त्याने तिला एका रिक्षात बसून मुरबाड रोडवरील एका लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे जिवेठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून एकच खळबळ उडाली.
अल्पवयीन मुलीने बुधवारी मध्यरात्री रडत रडत घर गाठून, झालेला प्रकार कुटुंबाला कथन केला. मुलीवर झालेल्या याप्रकाराने घाबरलेल्या कुटुंबाने मुलीसह मध्यरात्री उल्हासनगर पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून प्रथम पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी रिजवान शेख हा फरार होण्यापूर्वी पोलीस पथकाने उल्हासनगर येथील त्याच्या घरातून गुरवारी सकाळी अटक केली. न्यायालयाने आरोपीला २० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करीत असून लहान मुले मोबाईलवर नकळत काय करतात. याकडे कुटुंबाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.