मुंबई - धावत्या लोकलमधील दरवाज्यावर उभी राहून प्रवास करणाऱ्या तरुणीला प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाल्याचा व्हिडीओ सध्या व्हॉट्स अॅपवर खूप वायरल होत आहे. संबंधित तरुणीचा तपास सुरु असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, या वायरल व्हिडीओमुळे लोकलवरील दरवाज्यावर उभे राहून स्टंट करणाऱ्या तरुणाईला आवर घालण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.वायरल व्हिडीओनुसार, हेडफोन कानात घालून तरुणी पुरुषांच्या डब्यातुन प्रवास करताना दिसून येत आहे. तसेच वेगात धावत असलेल्या लोकलच्या दरवाज्यावर प्रवास करत होती. काही सेंकदांसाठी तरुणीलोकलच्या बाहेर डोकवली असता विरुद्ध दिशेने जोरदार वेगात लोकल आली. यावेळी तरुणीचा तोल गेल्याने ती दोन लोकलच्यामध्ये पडणार इतक्यात दरवाज्याच्या आतील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तिला पकडून लोकलमध्ये सुखरुप खेचून आणि तिचे प्राण वाचवले.वायरल व्हिडीओ बाबत कोणतीही तक्रार अद्याप दाखल आलेली नाही. या व्हिडीओतील तरुणी कोण आणि हा प्रकार नक्की कोणत्या लोकलमध्ये झाला? कोणत्या स्थानकादरम्यान झाला ? याचा शोध सुरु असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ कुर्ला ते ठाणे दरम्यान घडलेला असावा अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
धावत्या लोकलमधून तरुणीला पडताना वाचवण्याची कोणतीही घटना मध्य रेल्वेवर घडलेली नाही. मात्र, या प्रकरणी शोध घेत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. या घटनेमुळे धावत्या लोकलवरील दरवाज्यावर उभे राहून बाहेर डोकावणे, जीवघेणे स्टंट करणे या प्रकाराला आळा घालण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.