ठाणे : पैशासाठी शारीरिक, मानसिक छळ करणाऱ्या मित्राला कंटाळून तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली.३ मे रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सोनली बसरा असे या तरूणीचे नाव आहे. तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी टीएमटीमध्ये वाहक असलेल्या जुगल राठोडविरूद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे.सोनाली बसरा (२१) आणि तिचे वडील चंद्रकांत बसरा हे ठाण्यातील लोकमान्यनगर येथे वास्तव्याला आहेत. तर तिची आई अनंतनगर, खोपदा, (जव्हार, जि. पालघर) येथे वास्तव्याला आहे. सोनाली ठाण्यातील एका मॉलमध्ये नोकरी करते. तिचे आणि जुगलचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तिचा मित्र जुगल हा तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करीत होता.पैसे देण्यास तिने विरोध केल्यानंतर तिला तो मारहाणही करीत होता. तिच्यावर तो संशयदेखील घेत असे. या सर्वच कारणाला कंटाळून आपण आत्महत्या करणार असल्याचे सोनालीने जव्हार येथे असलेल्या आपल्या आईला फोनवरून ३० एप्रिल रोजी सांगितले होते.२ मे रोजी वडील काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर सकाळी १० ते ३ मे रोजी पहाटे १.१० वा. च्या दरम्यान तिने लोकमान्यनगर येथील आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारानंतर तो पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
मित्राच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:11 AM