जळगाव : व्हाटसॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक करणे २२ वर्षीय तरुणीला महागात पडले आहे. सायबर गुन्हेगाराने तरुणीचा फोटो एडिट करुन अश्लिल फोटो तयार केले व या लिंकद्वारे माहितीचे डेटा चोरुन त्याद्वारे तरुणीचे नातेवाईक तसेच ओळखीच्या लोकांमध्ये व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीकडून खंडणीही उकळण्यात आली आहे. याप्रकरणी रविवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे.
खासगी नोकरी करणाऱ्या या तरुणीला अनोळखी क्रमांकावरुन एक लिंक आली. त्यावर या तरुणीने क्लिक केले. त्यानंतर संबंधिताने तीन वेळा १६५० रुपये तरुणीला ऑनलाईन पाठविले. त्यानंतर तुम्ही आमच्याकडून कर्ज घेतल्याचे सांगून पैसे मागायला सुरुवात केली. तरुणीने तीन हजार रुपये संबंधिताला ऑनलाईन पाठविले देखील. त्यानंतर संबंधिताने तरुणीला तिचा चेहरा असलेला अश्लिल फोटो पाठवून खंडणीची मागणी केली.
बदनामीच्या धाकाने तरुणीने काही रक्कम दिली, परंतु पुन्हा पैशाची मागणी होऊ लागली. याच दरम्यान या गुन्हेगाराने चोरलेल्या डेटामधील तरुणीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील नातेवाईक व ओळखीच्या लोकांना व्हाटसॲपवर तिचे अश्लिल फोटो पाठविले. याबाबत नातेवाईकांकडून कॉल यायला लागल्याने तरुणीने घाबरली. ८ ते १६ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तिने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तीविरुद्ध खंडणी व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहे.