लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘लोकमत’च्या महिला पत्रकाराची सतर्कता व वरळी सायबर पोलिसांनी त्यांना दिलेल्या साथीमुळे १५ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले. तिच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने दादर परिसरातून तिला पोलिसांनी ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले आहे.
वरळी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एक फोन आला जो ‘लोकमत’च्या क्राईम रिपोर्टर मनीषा म्हात्रे यांचा होता. दादरच्या नायगाव येथे राहणारी एक मुलगी आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे सांगत घरातून एकटीच निघून गेली. त्यामुळे तिला वाचविण्यासाठी मदत करण्याची विनंती म्हात्रे यांनी केली. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रात्रपाळीवर असलेले पोलीस शिपाई बाबरे यांना मी याबाबत माहिती दिली व तत्काळ मुलीची तांत्रिक माहितीद्वारे तिचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तेव्हा बाबरे यांनी पोलीस उपनिरीक्षक सुयोग अमृतकर यांची मदत घेऊन, तांत्रिक पद्धतीने तिचा शोध घेतला. तेव्हा ती दादर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी बाबरे यांनी मुलीच्या वडिलांसह दादर परिसरातील रानडे रोड येथून तिला शोधून काढले. प्रथम तिला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली. त्यानंतर मुलीला तिची चूक लक्षात आल्यावर, तिच्या पालकांच्या ताब्यात साधारण पावणे अकराच्या सुमारास दिले.
दीड तास सुरू असलेल्या या सर्व शोधमोहिमेंतर्गत शिंदे हे मुलीचे वडील आणि म्हात्रे, तसेच पोलीस स्टाफच्या संपर्कात होते. मुलीच्या वडिलांनी यासाठी पोलीस तसेच म्हात्रे यांचे आभार मानले. तर ‘मुलीचा जीव वाचविणाऱ्या मुंबई पोलिसांना सलाम’, या भाषेत म्हात्रे यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि पथकाचे आभार मानले आहेत.