मुंबई : एकतर्फी प्रेमातून तरुणीला पाठविलेली फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून तरुणाने तरुणीचे बनावट खाते तयार करीत तिचा मोबाइल क्रमांक कॉल गर्ल म्हणून शेअर केला.तरुणाच्या विकृतीमुळे तरुणीला दिवसाला ४० ते ५० अश्लील कॉल येण्यास सुरुवात झाली. घडलेला प्रकार कुटुंबीयाना सांगून, आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगताच, कुटुंबीयाच्या सल्ल्याने तरुणीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. सायबर पोलिसांमुळे अवघ्या काही तासांतच पोलिसांनी अभिषेक पवार नावाच्या तरुणाला बेड्या ठोकल्या. वाकोला परिसरात २१ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसोबत राहते.पवारने तिच्याशी ओळख वाढविण्यासाठी फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. आधीमैत्री नंतर प्रपोज करण्याचे ठरवले. दोन वेळा फ्रेण्ड्स रिक्वेस्ट पाठवूनही तिने प्रतिसाद न दिल्याने त्याने तरुणीच्या नावाने तिचा फोटो वापरून इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. त्याखाली तरुणीचा मोबाइल क्रमांक शेअर करून अश्लील संवादासाठी संपर्क करण्यास सांगितले. त्यामुळे तरुणीला दिवसाला ४० ते ५० फोन येऊ लागले. १८ जुलैपासून या कॉलमुळे ती त्रस्त होती.अखेर, याबाबत आईला सांगून आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. आईने सायबर पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तरुणीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, आरोपीचा शोध सुरू केला.फेसबुकच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बनावट खाते तयार करणाऱ्यांची माहिती मिळवली. त्यात पवारचा चेहरा समोर आला. त्यानुसार पोलिसांनी तरुणीला विश्वासात घेत, याबाबत सांगितले. आणि पवारविरुद्ध गुन्हा नोंद करीत त्याला अटक केली.न घाबरता तक्रार करा!मुंबई पोलिसांनी शुक्रवारी ट्विट करीत या कारवाईबाबत सांगितले. तसेच कुणालाही अशा प्रकारे कोणी त्रास देत असल्यास त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
संतापजनक! तरुणीचा क्रमांक कॉल गर्ल म्हणून केला शेअर, दिवसाला ४० ते ५० अश्लील कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 2:49 AM