चैन्नई - 'Stop Sexual harassment', 'शिक्षकांवरही विश्वास ठेवू नका आणि नातलगांवरही विश्वास ठेवू नका... आता मुलींसाठी केवळ आईचे गर्भाशय आणि स्मशानच सुरक्षित राहिलं आहे'. या अतिशय भावनिक आणि मनाला पार हादरवून टाकणाऱ्या ओळी आहेत एका सुसाईड नोटमधील. चेन्नईच्या बाहेरील भागात राहणाऱ्या आणि 11व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलेने ही सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या बाहेरील भागात एक जोडपे राहते. त्यांची मुलगी अकरावीत शिकत होती. ही मुलगी शनिवारी छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली होती. घटनेच्या तपासात पोलिसांनी मुलीच्या खोलीतून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. यात 'केवळ आईचे गर्भाशय आणि स्मशानच सुरक्षित राहिले आहे,' असे या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. ही नोटा व्हायरल झाली आहे.
या मुलीच्या पालकांनी मुलीला छताला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीच्या खोलीची झडती घेतली, त्यात त्यांना ही सुसाईड नोट मिळाली. यासंदर्भात पोलिसांनी मुलीच्या मित्र-मैत्रीणींचीही चौकशी केली. यात, संबंधित मुलीने स्वतःला मित्रांपासून वेगळे केले होते आणि ती शांत-शांतच राहात होती.
'वाईट स्वप्न पडायचे, झोपच येत नव्हती...' -'Stop Sexual Harrasment' या शब्दांनी या नोटची सुरुवात होते. या मुलीने पत्रात लिहिले आहे, की ती आता आणखी सहन करू शकत नाही. तिला एवढा त्रास होत आहे, की कुठल्याही प्रकारचा धीर अथवा दिलासा तिला रोखू शकत नाही. आता तिच्यात शिकण्याची क्षमताच उरलेली नाही. तिला सातत्याने वाईट स्वप्न पडत आहेत. यामुळे तिला झोपही येत नाही.
या पत्रात पुढे लिहिले आहे, की "प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांना मुलींचा आदर करणे शिकवायला हवे. नातलग आणि शिक्षकांवर विश्वास ठेऊ नका. एकमेव सुरक्षित ठिकाण आईचे गर्भाशय आणि स्मशान आहे." एवढेच नाही, तर मुलींसाठी शाळाही सुरक्षित राहिलेल्या नाहीत, असेही या पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी मांगडू पोलिसांनी 4 विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके मुलीच्या फोन डिटेल्ससह अनेक गोष्टींचा तपास करत आहेत. या क्रमांकावर ज्यांचे फोन वारंवार आले आहेत, पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. संबंधित मुलीने आत्महत्या का केली, हे अद्याप पोलिसांना सांगितलेले नाही.