मुंबई : दोन पॅन कार्डापैकी एक पॅन रद्द करण्यासाठी एका व्यापाऱ्याकडून १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुंबईतील आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. या अधिकाऱ्याचे नाव उमेश कुमार असे असून, तो आयकर विभागाच्या वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात कार्यरत आहे.
शदाब मोहम्मद जावेद सय्यद या व्यापाऱ्याच्या भावाच्या नावे दोन पॅन कार्ड होती. मोबाईल खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी तो बँकेत गेला असता पहिले पॅन कार्ड न जुळल्याने त्याने दुसरे पॅन कार्ड दाखवले. ते पॅन कार्ड जुळले. मात्र एकाच व्यक्तीने दोन पॅन कार्ड बाळगणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे समजल्यावर तो वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कौटिल्य भवन येथील आयकर कार्यालयात गेला. तिथे पॅन कार्ड संबंधित अधिकारी उमेश कुमारकडे गेले. दोन पॅन कार्ड असल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करून १० हजार रुपयांचा दंड तसेच तुरुंगात जावे लागेल, असे त्याने सांगितले.
ही कारवाई टाळायची असेल तर मला १० हजार रुपये द्या, अशी मागणी उमेश कुमारने केली. दोघांनी आठ हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर या दोघांनी सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली. सीबीआयने पुन्हा त्या अधिकाऱ्याकडे चर्चेसाठी या दोघांना पाठवले आणि त्यावेळी डिजिटल रेकॉर्डर दिला. या रेकॉर्डरवर लाच घेण्यासंदर्भातले बोलणे रेकॉर्ड झाले. त्याची पडताळणी केल्यानंतर उमेश कुमारला अटक केली.