मुंबई - देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानींकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न मिळाल्यास जीव घेऊ असं अंबानींना धमकावलं आहे. त्यामुळे मुकेश अंबानींची सुरक्षा आणखी चोख करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर एका अज्ञात आयडीवरून ईमेल मिळाला आहे. त्यात मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलंय की, If you don’t give us 20 Crore rupees, we will kill you, we have the best shooter in India’ हा ईमेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सिक्युरिटी इन्चार्जच्या तक्रारीवरून मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३८७, ५०६(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्याने हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. तेव्हा कॉल करणाऱ्याने मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानीचे नाव घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचसोबत मुकेश अंबानींचे निवासस्थान असलेला एंटिलिया बंगलाही उडवण्याची धमकी दिली होती.
२०२१ मध्ये एंटिलिया बंगल्याबाहेर सापडली होती स्फोटकं
फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस अवस्थेत एक कार सापडली होती. जेव्हा या कारची पोलिसांनी पाहणी केली तेव्हा त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्याने खळबळ माजली. जवळपास २० जिलेटिन कांड्या आणि एक निनावी पत्र या कारमध्ये सापडले. त्या पत्रात मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता.