बीड : २० हजार रुपये द्या, पैशाचा पाऊस पाडून लाख रुपये देतो असे म्हणत फसवणूक करणाऱ्या टोळीला बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने गजाआड केले आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री बीड तालुक्यातील समनापूर परिसरातील गोरे वस्तीवर केली. यामधील सर्व आरोपी पुणे, नगर, औरंगाबादमधील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
भाऊसाहेब गोपाळ गिरी (४९, बिलोणी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), भगवान मेसू माने (६५, रा. पुणे), बाबासाहेब पोपट भोंडवे (४८, रा. पुणे), राहुल संजय वाळके (३०, रा. पुणे) बीड तालुक्यातील समनापूर येथे एका , देवेंद्र भाऊदास वैष्णव (२४, संगमनेर, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. हे पाचही जण चारचाकी गाडीतून (एमएच १२ जीव्ही ६६६२) गुरुवारी सायंकाळी समनापूर येथील गोरे वस्तीवर आले. येथील राजाभाऊ गोरे यांच्या घरी रात्रीच्या सुमारास जादूटोणा करण्याच्या उद्देशाने सर्व नियोजन झाले.
हळद, कुंकू, लिंबू घेऊन पैशाचा पाऊस पाडून देतो म्हणून सर्व जण पूजेसाठी बसले. ही माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावत याचा भांडाफोड केला. या सर्वांना बेड्या ठोकून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम २०१३ चे कलम २ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधकचे सपोनि गजानन जाधव, पो. ह. अभिमन्यू औताडे, श्रीमंत उबाळे, संजय खताळ, भारत बंड, राजाभाऊ नागरगोजे, राहुल शिंदे, महेश चव्हाण, नारायण साबळे यांनी केली.