नागपूर : राजकारणात खुर्चीसाठी चढाओढ असताना याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न करत गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी केली. देशातील सहा आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न केला. त्याने राज्य किंवा केंद्रात मंत्रिपद मिळवून देतो, असे आमिष दाखवत आमदारांना कोट्यवधींची मागणी केली. संशय आल्याने एका आमदाराने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर आरोपीची पोलखोल झाली. नीरजसिंह राठोड (मोरबी, अहमदाबाद) असे तोतया स्वीय सहायकाचे नाव असून, या प्रकारामुळे भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, राठोड याने भाजपच्या सहा आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केले होते. यात मध्य नागपूरचे आ. विकास कुंभारे, कामठीचे आ. टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आ. नारायण कुचे, तसेच गोवा येथील आ. प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आ. बाशा चँग यांचा समावेश आहे. दोन आठवड्यांअगोदर आ. कुंभारे यांना राठोड याचा फोन आला. त्याने नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत अगोदर एका कार्यक्रमासाठी सहकार्य हवे आहे, असे म्हटले. त्यानंतर तुमचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असून, तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर त्याने अगोदर १.६६ लाख व नंतर आणखी लागले तर पैसे देण्यासाठी तयार राहा, असे बजावले. त्याने तीन ते चारवेळा आ. कुंभारे यांना फोन केला.
संशय आला, गजाआड झाला -राज्यात कधी मंत्रिपदाबाबत विचारणा झाली नसताना अचानक दिल्लीहून विचारणा होते व पैसे मागितले जात असल्याने कुंभारे यांना संशय आला. त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता तसे काही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुंभारे यांनी पोलिस आयुक्तांच्या कानावर हा प्रकार टाकला व तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नीरजला गुजरातमध्ये जाऊन अटक केली. त्याला नागपुरात आणण्यात आले आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. राठोडने भाजपच्या अनेक आमदारांशी संपर्क साधला असल्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत आणखी कोण साथीदार आहेत व त्याचा बोलविता धनी कोण आहे, याचीदेखील चौकशी सुरू आहे.