कटिहार - मुंबई असो वा दिल्ली देशातील अनेक शहरांमध्ये तुम्हाला भिकारी लोकांकडे भीक मागताना पाहायला मिळतील. मुंबईत तर भिकाऱ्यांचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. ज्यात हजारोंच्या संख्येने भिकारी जोडले आहेत. भीक मागण्याच्या व्यवसाय वर्षाकाठी कोट्यवधीच्या घरात जातो. यात दिव्यांग मुले आणि मोठ्या प्रमाणात वृद्धांचा समावेश असतो. मुंबईत भिकाऱ्यांचे रॅकेट चालते. त्याचप्रमाणे आता बिहारमध्येही हे उघड झाले आहे.
रमजानच्या काळात मोठ्या संख्येने भाड्याने भिकारी बनवण्याचं रॅकेट उभं केले जात आहे. त्यांना भीक मागण्याचं काम दिले जात आहे. यातून मिळणारा पैशामधील मोठा हिस्सा माफियांपर्यंत पोहचवला जातो. दिव्यांगांकडून मशिदीसमोर जबरदस्तीनं भीक मागण्यास बसवल्याचं एक प्रकरण उघड झाले आहे. कटिहारच्या मनिहारी येथून दीड महिन्यापूर्वी गुलशन नावाचा दिव्यांग मुलगा बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याला खूप शोधलं परंतु तो सापडला नाही. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात रिपोर्ट नोंदवण्यात आला.
काही दिवसांनी हा दिव्यांग मुलगा कटिहारच्या रस्त्यांवर भीक मागत असल्याचं कुटुंबाला कळालं. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देत कटिहार गाठलं. त्यानंतर गुलशनच्या कुटुंबाने जे सांगितले ते धक्कादायक होते. गुलशननं त्याच्या कुटुंबाला सांगितले की, मनिहारीतून एका व्यक्तीने मला फसवून घेऊन गेला. या व्यक्तीचं भिकाऱ्यांशी नेटवर्क होते. तो स्वत: भीक मागतो. सुरुवातीला मला भीक मागण्याचं ट्रेनिंग दिले गेले. त्यानंतर दिवसाला १ हजार ते १५०० रुपये भीक जमा करण्यास सांगितले. हा पैसा ते जमा करतात त्यातील मोठा हिस्सा सिडिंकेटमध्ये जातो. त्यात अनेकजण सहभागी असल्याचं मुलाने सांगितले.
ज्या मुलांचं अपहरण करून भीक मागण्यासाठी लावण्यात येत होते त्यातील बहुतांश अल्पवयीन होते. या रॅकेटमागे काही मोठ्या लोकांचाही हात आहे. जे दिवसाचे कलेक्शन आणि पैशांचा हिशोब ठेवतात. गुलशनने हाजीपूर परिसराचा उल्लेख करत त्याठिकाणी बळजबरीने मुले आणि वृद्धांना भीक मागण्यासाठी अपहरण करून ठेवल्याचं सांगितले. त्याचठिकाणी त्याला ट्रेनिंग दिली गेली. मात्र गुलशनच्या खुलाशामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.