सोलापूर : म्हातारपणाची आधाराची काठी म्हणून वृध्द आई-वडिलांचा सांभाळ करण्याचे कर्तव्य विसरून त्यांना भर पावसात बंगल्यातून हाकलून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी नाकारणाऱ्या कोट्यधीश मुलाविरुध्द कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी धाव घेतली आहे. नागनाथ पंढरी थिटे (वय ६५) व निर्मला नागनाथ थिटे (वय ६२) या वृध्द दाम्पत्याने पोटचा मुलगा शिवाजी नागनाथ थिटे (वय ३५, रा. अंत्रोळीकर नगर, होटगी रोड,सोलापूर) याच्याविरुध्द दरमहा २५ हजार रूपये पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांनी या प्रकरणात शिवाजी थिटे यास ८ मार्च २०२२ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पीडित वृध्द दाम्पत्य नागनाथ थिटे व निर्मला थिटे यांना पाच मुली व एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा शिवाजी यास जिवापाड कष्टाने वाढवले. चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आईने तर तिच्या नावे असलेली पाच एकर जमीन मुलाच्या नावे केली. मुलाचे सोलापुरात घरगुती गॅस विक्री , वाहतुक, शेती, सावकारी असे अनेक व्यवसाय आहेत. त्यातून त्याने अमाप माया कमावली आहे. सोलापूरच्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी व शेती खरेदी केली आहे. जागा भाडयाने दिल्या आहेत. सोलापूरचे मलबार हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंत्रोळीकर नगरासारख्या उच्चभ्रू भागात त्याचा स्वतःच्या मालकीचा आलिशान बंगला आहे. आई-वडिलाच्या नावे असलेली पीर टाकळी (ता. मोहोळ) येथे असलेली दोन एकर जमीन स्वतःच्या नावाने करुन द्या म्हणून त्याने असा तगादा लागला. त्यास आई-वडिलांनी नकार देताच तो त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ लागला.
मुलाने आई -वडिलांना अपमानास्पद वागणुक दिली. एवढ्या मोठया बंगल्यात राहण्याची तुमची लायकी नाही म्हणून आई-वडिलांना मुलगा व सून हिणवू लागले. त्यांना वेळेवर जेवण न देणे, उपाशी ठेवणे, आजारी पडले तर उपचारासाठी दवाखान्यात न नेणे असा प्रकार चालू केला आणि घरातून भर पावसात हाकलून दिले. मुलगा आणि सून दोघेही ऐष आरामात, विलासी जीवन जगत आहेत, तर दुर्दैवी आई-वडिलांना बाळे गावात एका छोटया आणि गैरसोयीच्या घरात एकाकी जीवन कंठत आहेत. त्यांना उपजीविकेचे कोणतेही साधन नाही, असे गा-हाणे त्यांनी मांडले आहे. याप्रकरणी वयोवृध्द आई-वडिलांतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. मनोज गिरी, ॲड. विकास मोटे, ॲड. सिध्देश्वर खंडागळे काम पाहात आहेत.