अमरावती: सायबर हॅकिंगची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. हॅकर्स रोज नवीन युक्त्या शोधून सर्वसामान्यांना आपल्या फसवणुकीचा बळी बनवत आहेत. अलीकडे हॅकिंगचे नवीन प्रकरणे समोर आले. ठग लिंक किंवा मेसेजद्वारे खाते रिकामे करत आहेत. असेच काही प्रकार वीज बिल भरा अन्यथा वीज कापली जाईल, अशा कॉलमधून होत आहे. अचलपूर येथील एका वीजग्राहकाची अशीच सुमारे ६० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी वीजग्राहक शैलेंद्र मिश्रा (६४, नरसाळा, अचलपूर) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी ३० जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. २९ जानेवारी रोजी मिश्रा यांच्या खात्यातून एकूण ५९ हजार ९९७ रुपये परस्पर डेबिट झाले. रविवारी दुपारी मिश्रा यांना एका क्रमांकाहून फोन कॉल आला. एमएसईबी कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करून वीजबिल बाकी आहे. बिलाची रक्कम रात्री ९.३० पर्यंत न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे तो पलीकडून बडबडला. त्या अज्ञात कॉलरने फिर्यादीला बँक खाते क्रमांक व मेल आयडी मागितला. सबब, मिश्रा यांनी त्यांच्या परतवाडास्थित बँकेतील खात्याची डिटेल्स दिली.
आरोपीने त्यानंतर त्यांना क्विक चेक बिल ॲप डाऊनलोड करण्यास सुचविले. ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर आरोपीने पाच अंकी नंबर त्यात ॲड करण्यास सांगितले. तो क्रमांक टाकताच त्यांच्या बँक खात्यातून प्रथम १० हजार व नंतर ४९ हजार ९९९ रुपये कट झाल्याचा संदेश झळकला. तो फटका बसताच आपली फसवणूक झाल्याचे मिश्रा यांच्या लक्षात आले. ३० जानेवारी रोजी रात्री त्यांनी पोलिस ठाणे गाठले
...अन् होतो मोबाइल हॅक!
चोरट्यांनी पाठविलेली लिंक प्रत्यक्षात वीज बिल वसुलीची नसते. हॅकर्स या लिंकद्वारे मोबाइल हॅक करतात. या लिंकवर क्लिक केल्यावर ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात. काही कळायच्या आत ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रोकड लंपास केली जात असते.
अशी होते फसवणूक
हॅकर्स व्हॉट्सॲप आणि एसएमएसद्वारे लिंक पाठवून ही फसवणूक करतात. यामुळे, यूजर्स लिंकद्वारे हॅकर्सच्या जाळ्यात अडकले जातात आणि आपली रक्कम गमावून बसतात. अनेकदा हॅकर्सच्या माध्यमातून पाठवलेल्या मेसेजमध्ये वीज बिल तत्काळ न भरल्यास वीज तोडण्यात येईल, अशी धमकी देण्यात येत असते. अशा वेळी सर्वसामान्य व्यक्ती घाबरून संबंधित लिंकवर क्लिक करतात आणि पैसे गमावून बसतात.