लोकमत न्यूज नेटवर्क हणजूण : हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर पर्यटकांवर तलवार, चाकू व सुऱ्याने प्राणघातक हल्ला करून जबर मारहाण केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी रॉयस्टन रेजनाल्डो डायस, नायरॉन रेजिनाल्डो डायस (दोघेही रा. डिमेलोवाडो, हणजूण) व काशिनाथ आगरवाडेकर (रा. सोरांटोवाडो, हणजूण) या तिघा संशयितांना अटक केली. या हल्लेखोरांविरोधात भादंसं कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ आणि इन्स्टाग्रामवर संबंधित पर्यटकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन ही कारवाई केली आहे. मारहाणीची घटना गुरुवारी, ९ मार्च रोजी घडली होती. त्यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध कलम ३०७ चा वापर न करता ३२४ कलम वापरून त्यांना लगेच मोकळे सोडले होते.
इन्स्टाग्रामवरून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार जतीन शर्मा व त्यांचे कुटुंबीय हणजूण (अंजुना) येथील स्पेसिओ रिसॉर्टमध्ये उतरले होते. पाच ते नऊ मार्चपर्यंत त्यांचे येथे वास्तव्य होते, व्हिडीओमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ मार्च रोजी रिसॉर्टमधील एका कर्मचाऱ्याने त्यांच्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी याबद्दल त्याला जाब विचारून तेथील व्यवस्थापकाला याची कल्पना दिली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने आपल्या काही साथीदारांना हॉटेलबाहेर बोलावून पर्यटक बाहेर पडत असताना त्यांच्यावर तलवार व चाकू-सुऱ्यानिशी प्राणघातक हल्ला केलाय. यात हे पर्यटक जबर जखमी झाले.
याबाबत संबंधितांनी हणजूण पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध ३२४ कलमाखाली गुन्हा नोंद करून पोलिस स्थानकात हजर राहण्यासाठी त्यांना नोटीस बजावली.पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा करून संशयितांविरुद्ध योग्य कारवाई न केल्याचे लक्षात येताच तक्रारदार जतिन शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड केला. याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हणजूण पोलिसांना संशयितांविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यास सांगून अटकेचेही आदेश दिले. त्यानुसार हणजूण पोलिसांनी तिघांविरोधात कारवाई केली. मारहाणीसाठी वापरलेले तलवार, चाकू व सुरे जप्त केले.
उपनिरीक्षकाची बदली, चौकशीचे आदेशपर्यटकांवर झालेल्या हल्ला प्रकरणात हे प्रकरण खुनाचा प्रयत्न म्हणून नोंदविण्याऐवजी केवळ हल्ला म्हणून नोंदवण्याचा प्रयत्न केल्याबाबत उपनिरीक्षक फ्रान्सिस झेवियर यांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला. त्यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही याची माहिती मिळाल्यावर त्यांनी ट्विट करून निषेध नोंदविला आहे.
हणजूण येथील हिंसक घटना धक्कादायक आणि असह्य आहे. मी पोलिसांना याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जे गुन्हेगार, समाजकंटक राज्यातील लोकांची शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करतात, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.-प्रमोद सावंत, मुख्यमंत्री