उल्हासनगर : शहरातील २६ सेक्शन येथील एक दुकान व बंद खोलीवर अन्न व औषध प्रशासन विभाग व विठ्ठलवाडी पोलिसांनी गुरुवारी दुपारी २ वाजता धाड टाकून तब्बल ११ लाखाच्या गोवा व पान मसाला गुटख्यासह इतर साहित्य जप्त केले. नवीन दुसेजासह दोघांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरातील पान टपरीवर सर्रासपणे गुटख्याची विक्री होत असून अन्न व औषध प्रशासन विभागासह स्थानिक पोलीस कारवाई का करीत नाही?. अशी चर्चा होत होती. गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी भरत वसावे यांच्या पथकाने, विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने २६ सेक्शन येथील एक दुकान व बंद खोलीवर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून झाडाझडती घेतली. झाडाझडतीत तब्बल ११ लाखाच्या गोवा व पान मसाला गुटक्यासह इतर साहित्याचा साठा जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेलाल थोरात यांनी दिली. या कारवाई पाठोपाठ शहरातील पान टपरीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विठ्ठलवाडी पोलिसांनी भरत वसावे यांच्यासह बंद खोली भाडेकरू यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच भाडेकरुचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकूणच शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असतांना अवैध धंद्यालाही ऊत आल्याची चर्चा होत आहे. कॅम्प नं- ३ येथील आंचल बार मध्ये स्थानिक नागरिकांनी घुसून अश्लील नुत्य व धिंगाणा बंद पडल्याचा प्रकार गुरुवारी झाला. आचांल डान्स बार बंद पाडल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावरही पोलीस उशिरा आल्याचा आरोपही नागरिकांनी केला.