झारखंडमधील गोड्डा येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवर झालेले प्रेम खरे समजून एक तरुणी आपल्या प्रेमीला भेटायला मुंबईहून गोड्डा येथे आली. मात्र, ज्यावेळी ती तरूणाला भेटली, त्यावेळी तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, तिचा प्रियकर फ्रॉड ठरला. या तरुणीने रस्त्यावर उभे राहून आपल्या प्रेमाची कबुली दिली, पण तरुणाने तिला बाजारात मारहाण केली. इतकेच नाही तर या तरुणाने तिच्या पर्समधून सुमारे दीड लाखांची रोकड व दागिने चोरले आणि पळ काढला.
मुंबईची एक तरुणी तिच्या प्रियकराला भेटायला आली, तेव्हा क्रूर प्रियकराने तिचे आनंदाने स्वागत करण्याऐवजी तिला मारहाण केली. तरीही तरुणी त्याच्यासमोर विनवणी करत राहिली, पण प्रियकराने तिच्यावर दया केली नाही. दीड लाखांची रोकड व दागिने घेऊन पळ काढला. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी प्रियकराला अटक केली. तसेच, पोलिसांनी दीड लाखांची रोकड व दागिने जप्त केले. पोलिसांनी सांगितले की, फेसबुकच्या माध्यमातून तरुणाने पीडित तरुणीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी झारखंडच्या सिमडेगा येथील आहे. मुलीने सांगितले की सुमारे तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री सुरू झाली आणि त्यानंतर मिस्ड कॉलवरून दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. तसेच, ही तरुणी मुंबईत नोकरी करायची. यानंतर तो मुलगाही मुंबईला आला होता. त्यावेळी त्याने एकत्र राहण्याचे तिला वचन दिले. दरम्यान, तरुणीने तिच्या कष्टाच्या पैशाने त्याच्यासाठी बाईकही विकत घेतली होती.
शुक्रवारी ही मुलगी मुंबईहून पाटण्यात आली होती. पाटण्याहून तरुण तिला घरी घेऊन जातोय असे सांगून तो गोड्डा येथे घेऊन आला. हा तरुण झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील बेलबड्डा पोलीस स्टेशन परिसरातील धोडा गावचा रहिवासी आहे. अभिषेक कुमार असे त्याचे नाव आहे. गोड्डाला पोहोचल्यानंतर त्या तरुणाने तिला घरी नेण्यासाठी दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
तरुणीने याचा विरोध केला असता त्याने तिला बाजारात मारहाण केली. यावेळी रस्त्यावर असलेल्या लोकांनी त्याला अडविण्याच प्रयत्न केला. मात्र, त्याने आमच्या पती-पत्नीची परस्पर बाब असल्याचे सांगत तेथून निघण्यास सांगितले. हे प्रकरण पाहून काही लोकांना संशयास्पद वाटले, मग लोकांनी पोलिसांना बोलावले असता त्याने तेथून पळून गेला.
यानंतर गोड्डा नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तरुणीला पोलीस ठाण्यात आणले. काही तासातच फरार असलेल्या अभिषेकला पोलिसांनी अटक केली. शहर पोलीस प्रभारी मुकेश पांडे म्हणाले की, अटक केलेल्या तरुणाची चौकशी केली जात आहे. तसेच, त्याच्याकडून रुपये व दागिने जप्त केले आहेत. मुलीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.