यवतमाळ : शहरातील मागासवर्गीय कुटुंबाची मोक्यावरची जमीन कागदोपत्री हडपून तिचा मोबदला लाटणाऱ्या बंटी उर्फ आनंद द्वारकाप्रसाद जयस्वाल याला यवतमाळपोलिसांनी तिरुपती येथे जाऊन बुधवारी अटक केली. यावेळी त्याच्यासोबत साथीदार गोपाल बख्तियार यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले. आरोपी बंटी जयस्वाल याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
दीपक मधुकर पाटील (रा.भोसा) यांच्यासह त्तीन भावांच्या नावाने मोक्याच्या जागी असलेली शेतजमीन परस्पर खरेदी तयार करून हडपली. इतकेच नव्हे तर आरोपी आनंद उर्फ बंटी जयस्वाल याने या जमिनीचा स्वत:च्या नावे एनए (अकृषक) करून घेतला, अशी तक्रार दीपक पाटील यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून बंटी जयस्वाल, गोपाल बख्तियार, रवींद्र जेठवाणी, सुलेमान खान हाशम खान यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर ते आरोपी पसार झाले होते. याच प्रकरणात बंटी जयस्वाल याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी सराईत असल्याने पोलिसांना चकमा देत होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी विशेष पथक तयार केले. सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक निरीक्षक गजानन करेवाड, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेणे सुरू केले. आरोपी तिरुपती येथे दडून असल्याची माहिती मिळताच बुधवारी या पथकाने तिरुपती गाठले. तेथून बंटी जयस्वाल व गोपाल बख्तियार यांना अटक करून यवतमाळात आणले. पुढील तपासासाठी आरोपींना अवधुतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाल्याने याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे देण्यात आला. आरोपींना अतिरक्त सत्र न्यायाधीश भन्साली यांच्या न्यायालयात हजर केले. बंटी जयस्वाल याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, तर गोपाल बख्तियार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी पसार आहेत. त्यांच्या अटकेची कारवाई कधी होते, याकडे लक्ष लागले आहे.