उत्तर प्रदेशच्या लखनौ विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी लपवून सोन तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. संबंधित व्यक्ती दुबईहून भारतात आली होती, त्याची झडती केली असता, त्याच्याकडून कस्टमने अधिकाऱ्यांनी ६०१.८ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३६.९३ लाख एवढी असून आरोपी व्यक्तीचं नाव चौधरी चरणसिंह असं आहे. आरोपीने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून हे सोनं आणलं होतं.
चौधरी चरणसिंह हे सोमवारी रात्री दुबईहून लखनौच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यावेळी, कस्टमच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे पाहून संशय आला. त्यामुळे, अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीची संपूर्ण तपासणी केली. मात्र, या तपासणीती कुठेही त्यांच्याकडे सोनं आढळून आलं नाही. म्हणून, अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीचं स्कॅनिंग केल्यावर त्यांनी मलाशयात हे सोनं लपवलं होतं, असं दिसून आलं.
दरम्यान, कस्टमने संबंधित व्यक्तीकडून सोनं ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे. या व्यक्तीने ज्यापद्धतीने सोनं लपवलं होतं, ते पाहून अधिकारीही आश्चर्यचकीत झाले आहेत. लोकं, कशाप्रकारे स्मगलिंग करतात याचं हे उदाहरण असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारे सोनं किंवा मौल्यवान वस्तूंची तस्करी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
वाराणसी विमानतळावरही युएईवरुन आलेल्या व्यक्तीकडून ३८ लाख रुपयांचं सोन जप्त करण्यात आलं आहे. या व्यकीनेही आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये सोन्याच्या पेस्टच्या तीन कॅप्सुल ठेवल्या होत्या. विमानतळावरील स्कॅनिंगमध्ये हे सोनं दिसून आल्यानंतर जप्त करण्यात आलं. हे सोनं ६३३ ग्रॅम एवढं होतं. आरोपीचं नाव संदीप असून तो वाराणसीचाच स्थानिक रहिवाशी असल्याची माहिती आहे.