मुंबई : इथिओपिया येथून आलेल्या मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका परदेशी महिलेच्या संशयास्पद हालचालींनंतर तिला थांबवत तिची झडती घेतली असता कस्टम अधिकाऱ्यांना चक्क तिच्या चपलेच्या तळात आणि जिन्समध्ये तब्बल अडीच किलो सोने आढळून आले. यामध्ये सोन्याचे २५ बार आणि काही सोन्याचे दागिने आहेत, ज्यांची किंमत १ कोटी १० लाख रुपये इतकी आहे.मंगळवारी रात्री इथिओपिया येथून मार्यन मोहम्मद नबीसार नावाची एक २५ वर्षीय तरुणी मुंबई विमानतळावर उतरली. सामान घेतल्यानंतर ती बाहेर पडण्याच्या तयारीत होती. दरम्यान, तिच्या हालचाली संशयास्पद असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यांनी तिच्या सामानाची झडती घेतली. मात्र, त्यात काहीही आढळून आले. मात्र, ज्यावेळी महिला कस्टम अधिकाऱ्यांनी तिची सखोल तपासणी केली त्यावेळी तिने परिधान केलेल्या जिन्सच्या चोर कप्प्यात सोन्याचे २५ बार तिने लपवले असल्याचे आढळून आले, तर तिच्या चपलेचा तळ जाडसर होता. तो कापून पाहिला असता त्यात तिने सोन्याचे लहान दागिने दडविले होते.
तस्करीची पहिलीच वेळकस्टम अधिकाऱ्यांनी या महिलेला अटक करत तिच्या जवळ असलेले सोने जप्त केले आहे. आपण पहिल्यांदाच सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती तिने अधिकाऱ्यांना दिली. मात्र, या मागे कोणती टोळी सक्रिय आहे का, याचा अधिकारी अधिक तपास करत आहेत.