कोल्हापूर - हिरे, सोने-चांदी या सराफ व्यवसायामध्ये मोठा फायदा आहे असे सांगुन कोल्हापूरातील दोघा प्रसिध्द उद्योगपतींना सुमारे पाच कोटींचा गंडा घालणाऱ्या राजारामपुरीतील गोल्ड म्युझियमच्या मालकास बेळगावमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुरुवारी अटक केली. संशयित राजू ईस्माईल बेग (वय ५३, रा. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचेसमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याची पत्नी फिरोजा बेग ही फरार असून तिचा शोध घेत आहेत.पोलीसांनी सांगितले, संशयित राजू बेग याने उद्योगपती जोन बारदेस्कर आणि दिलीप रामचंद्र मोहिते यांना सराफी व्यवसायात मोठा नफा आहे, व्यापार फायदेशीर आहे असे आमिष दाखवून दोघांकडून पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करुन घेत राजारामपुरीत मेनरोडवरील सातव्या गल्लीमध्ये गोल्ड म्युझियम नावाचे आलेशान सराफी दूकान सुरु केले होते. सुरुवातीला त्याने मोठा नका मिळवून देऊन भागिदारांचा विश्वास संपादन केला. परंतु नंतर व्यवसायातील उत्पन्न देण्यास खंड पडू लागल्याने संशयिताच्या वर्तवणुकीबाबत शंका येवू लागली. परतावा येणे बंद झाल्याने बारदेस्कर आणि मोहिते यांनी माहिती घेतली असता राजारामपुरी येथील सराफी दूकानात राजू बेग याने खोटे सोने ठेवले आहे. खरे सोने बेळगाव व कणकवली येथील आलेशान दूकानात ठेवले आहे. आपली फसवणूक झालेचे लक्षात येताच त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संशयित राजू बेग, त्याची पत्नी फिरोजा बेग यांचे विरोधात फिर्याद दिली.फसवणुकीचा आकडा पाच कोटी असल्याने गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. संशयित बेग याने मुंबई उच्च न्यायालयात जामिन मंजूरीसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला १ कोटी ५० लाख रुपये भरण्यास मुदत दिली होती. परंतु त्याने ते भरले नसल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला. तसेच पोलीसांना पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यापासून तो फरार होता. तो बेळगाव येथे आलेचे समजताच पोलीस निरीक्षक अशोक इंदूलकर, हवालदार अविनाश गावडे यांनी अटक केली.
संशयित राजू बेग याला अटक केली असून त्याचेकडे सखोल चौकशी सुरु आहे. त्याने अनेक व्यापाऱ्याना गंडा घातलेची शक्यता आहे. त्याची न्यायालयाचे आदेशानुसार बँक खात्याची माहिती घेवून ती गोठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याच्या स्थावर मालमत्तेची माहिती घेतली जात असून त्यावरही टाच आनली जाणार आहे. - पद्मा कदम, पोलीस उपअधीक्षक