नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: तब्बल साडेआठ-नऊ किलो वजनाच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना नागपुरातील 'गोल्ड स्मगलर्स' शुक्रवारी पकडले गेले. त्यामुळे रेल्वेतून होणारी 'गोल्ड स्मगलिंग' पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.
गांजा, दारू, एमडी अशी अंमली पदार्थांची खेप घेऊन जाणारे येणारे अनेक जण आहेत. रेल्वे पोलीस, आरपीएफ, सीआयबी आणि डीआरआयची अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या नेटवर्कवर खबऱ्यांच्या माध्यमातून नजरही असते. त्यामुळे ते वारंवार पकडले जातात. सोन्याची तस्करी करणारे 'खिलाडी' मुरलेले असतात. ते अगदी सहजपणे वावरतात. त्यांची पद्धतही वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यावर तपास यंत्रणांची नजर जात नाही. विशेष म्हणजे, अंमली पदार्थाचा उग्र दर्प येत असल्याने ते डिटेक्ट होतात. शस्त्र, अग्निशस्त्र (पिस्तुल) घेऊन जाणारेही मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून पकडले जातात. सोने डिटेक्ट करणारी यंत्रणा तूर्त कोणत्या रेल्वे स्थानकावर नाही. त्यामुळे सोने तस्करीचा खेळ बिनबोभाट चालतो.
अधून मधून तो वेगवेगळ्या पद्धतीने उजेडातही येतो. गेल्या वर्षी साऊथमधून आलेल्या एका व्यक्तीला नागपूर स्थानकावर अशाच पद्धतीने सोन्याच्या बिस्किटासह ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर नागपुरात येणाऱ्या अमृतसर (पंजाब) मधील एका व्यापाऱ्याचे एक किलो सोने धावत्या रेल्वेतून चोरीला गेले होते. हेच काय, काही वर्षांपूर्वी अकोला-अमरावतीत मोठे प्रस्थ असलेल्या एका सोन्याच्या व्यापाऱ्याच्या मालावरही चोरट्यांनी रेल्वेत हात साफ केला होता. गोल्ड स्मगलिंगच्या या घटनांकडे लक्षवेध होऊनही फारसे गांभिर्याने लक्ष दिले गेले नव्हते. त्याचमुळे 'गोल्ड स्मगलर्स सक्रिय' असल्याचे आता बोलले जात आहे.
खरेदीची धूम होणार, म्हणून ...!
शनिवारी १४ ऑक्टोबरला श्राद्धपक्ष संपले. या मासात फारसे कुणी माैल्यवान चिजवस्तूंची खरेदी करत नाही. मात्र, त्यानंतर सुरू होणारा कालावधी दिवाळीपर्यंत खरेदीची धूम मचविणारा असतो. १५ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. नवरात्रीच्या काळात सोने खरेदी करणारांची संख्या वाढते. मागणी वाढल्याने 'गोल्ड मार्केट'अधिकच झळाळते.
पक्की टिप मिळाल्यामुळेच तस्कर जेरबंद
नवरात्रीत सोन्याची खरेदी वाढणार, असा अंदाज असल्यामुळे अनेक विक्रेते मोठ्या प्रमाणात पूर्ण पक्का व्यवहार करून सोने जमवून ठेवतात. तर, काही जण कर आणि चुकविण्याच्या नादात सोन्याचे ब्लॅकमार्केटिंग, तस्करी करतात. रायपूर (छत्तीसगड)मध्ये सोन्याची मोठी मंडी आहे. येथून कच्चा - पक्क्या सोन्याची खेेप नागपूर-विदर्भासह साऊथमध्ये मोठ्या प्रमाणात जाते. शुक्रवारी डीआरआयला पक्की टिप मिळाल्यामुळेच सोन्याची तस्करी उघड झाली.