मुंबई :
परदेशातून तस्करीच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या सोन्याचा माग काढतानाच, या सोन्यावर प्रक्रिया आणि साठवणूक करण्यात येणाऱ्या मुंबईतील एका ठिकाणावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी छापेमारी करत २१ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे, या सोन्याच्या तस्करीमध्ये परदेशी नागरिकांच्या सहभागाचा देखील भंडाफोड करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.
डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून परदेशी नागरिकांच्या माध्यमातून भारतात होणाऱ्या सोने तस्करीचा पॅटर्न डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अभ्यासला होता. तसेच त्यावर पाळत ठेवली होती. या दरम्यान काही विशिष्ट परदेशी नागरिक सातत्याने भारतामध्ये येत असल्याचे त्यांना आढळून आले. तसेच इथे आल्यावर ज्या भारतीय नागरिकांशी ते संपर्क करत त्यांची देखील माहिती अधिकाऱ्यांनी जमा केली. ही माहिती जमा केल्यानंतर सोन्याच्या तस्करीचे एक मोठे रॅकेट सुरू असल्याचे त्यांना समजले.
अशी होते तस्करी ! सोन्याची पावडर, पेस्ट किंवा कॅप्सूलमध्ये सोने दडवून ते पोटात साठवून ही तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. हे सोने मुंबईत एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवले जाते आणि तिथे त्यावर प्रक्रिया करून मुंबई तसेच अन्य शहरांतील व्यापाऱ्यांना विकले जाते. विशेष म्हणजे, हे सोने विकणाऱ्याला आणि विकत घेणाऱ्याला एक सिक्रेट कोड दिला जात असे. तो कोड सांगितल्यावर खात्री पटल्यावरच याचा व्यवहार होत असे.
मुंबईत तस्करीचे हे रॅकेट कुठून सुरू आहे, याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान तेथून २१ कोटी रुपये मूल्याचे ३६ किलो सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले. तर ज्या जागेतून ही तस्करी सुरू होती, त्या मालकाकडे अवैधरीत्या असलेली २० लाख रुपयांची रक्कमदेखील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.