मुंबई - महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) केलेल्या धडक कारवाईत देशातील सोने तस्करीचे मोठे जाळे उध्द्वस्त करत ४२ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत १६ कोटी ५० लाख रुपये आहे. कोलकाता, रायपूर व मुंबईत कारवाई करत डीआरआयने सोने तस्करांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून डीआरआयचे अधिकारी, कर्मचारी या कारवाईमध्ये गुंतले होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. कोलकाता येथील गोविंद मालवीय, फिरोज मुल्ला या आरोपींच्या निवासस्थानावर धाड टाकल्यावर २६.६५० किलो सोने सापडले. हे सोने विदेशातून आणण्यात आले होते. ५५२.०३० ग्रॅम वजनाचे दागिने यावेळी सापडले. त्याची किंमत १० कोटी ५७ लाख होती. सीमाशुल्क कायदा १९६२ अन्वये हे सोने जप्त करण्यात आले.
मालविय, मुल्ला, अण्णा राम, महेंद्र कुमार, सुरज मगाबुल, कैलाश जगताप, विशाल माने या सात आरोपींना अटक करण्यात आली. त्यावेळी केलेल्या चौकशीत गोविंद मालवीय याने दोन पार्सल समरसत्ता एसएफ एक्सप्रेस (रायपूर) व एलटीटी कुर्ला एक्सप्रेसने मुंबईला पाठवल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये रायपूर येथे ८ किलो व मुंबईत ७ किलो सोने जप्त करण्यात आले. यावेळी गोपराम व मिलन कुमार, साहिल जैन या आरोपींना अटक करण्यात आली. या आर्थिक वर्षात डीआरआयने पूर्व विभागात सुमारे २१९ किलो सोने जप्त केले आहे.