लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने गुरुवारी केलेल्या विशेष ऑपरेशनमध्ये एकूण १५ किलो सोने जप्त करण्यात आले असून, याची किंमत ७ कोटी ८४ लाख रुपये इतकी आहे. याखेरीज २२ लाख रुपये मूल्याचे परदेशी चलनदेखील जप्त केले आहे. एकाचवेळी केलेल्या सहा शोध कारवायांमधून सातजणांना अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दुबई येथून गुरुवारी संध्याकाळी आलेल्या एका भारतीय प्रवाशाने आणलेले तब्बल ९ किलो ८९ ग्रॅम सोने कस्टम विभागाने पकडले असून, याची किंमत ५ कोटी २० लाख रुपये इतकी आहे. या प्रवाशाने शर्टाच्या आतील बाजूला एक कापडाचा खण असलेली एक पट्टी तयार करून त्यामध्ये हे सोने लपविले होते. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना या व्यक्तीकडे १५ सोन्याचे बार आढळून आले. दोन सुदानी नागरिकांनी सोने दिल्याची माहिती या भारतीय व्यक्तीने दिली. त्यानंतर, त्याच विमानातून आलेल्या दोन्ही सुदानी नागरिकांनाही अटक केली. तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये, शारजातून चेन्नईमार्गे मुंबई गाठलेल्या एका व्यक्तीकडून १ किलो ८० ग्रॅम सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. याची किंमत ९९ लाख रुपये इतकी आहे. हे सोने त्याने त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये लपविले होते.
तिसऱ्या घटनेत जेहाद येथून आलेल्या दोन भारतीयांकडून अनुक्रमे १०६८ ग्रॅम आणि ११८६ ग्रॅम सोने पकडण्यात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या सोन्याची अनुक्रमे किंमत ५६ लाख आणि ५८ लाख रुपये इतकी आहे. चौथ्या घटनेमध्ये एका सुदानी नागरिकाकडून ९७३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून, याची किंमत ५१ लाख रुपये इतकी आहे. तर, उर्वरित दोन कारवायांमध्ये दुबईतून आलेल्या दोन भारतीयांकडून २२ लाख रुपये भारतीय मूल्य असलेल्या दुबईचे चलन जप्त करण्यात आले आहे.