मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वरुन मुंबईहून हैद्राबादकडे जाणाऱ्या दोन प्रवाशांकडून १९ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.
क्रांती नाथ पुलुमती (ब्रिटीश नागरिक) व परिणीता इरुकुल्ला हे प्रवासी लंडन येथून मुंबईत आले होते. मुंबईहून जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यु ३९१ या विमानाने हैद्राबाद येथे जाण्याच्या तयारीत होते. उड्डाणापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासणीमध्ये या दोघांकडे एकूण ३ सोन्याची नाणी सापडली. सुमारे ६०० ग्रॅम वजनाचे हे सोने दोघांकडून जप्त करण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १९ लाख रुपये आहे. सीआयएसएफच्या जवानांनी याबाबत त्वरित आपल्या वरिष्ठांना माहिती दिली व सीमाशुल्क विभागाच्या एआययु विभागाला कळवण्यात आले. आरोपी व मुद्देमाल सीमाशुल्क विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती सीआयएसएफचे सहाय्यक महानिरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी हेमेंद्र सिंग यांनी दिली.