ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या क्रेझसोबतच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ होत आहे. फसवणूक करणारे नवनवीन पद्धती वापरत आहेत. बिहारच्या गोपालगंजमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला असून पोलीसही त्यामुळे हैराण झाले आहेत. 510 रुपयांत ड्रेस विकत घेणाऱ्या विद्यार्थिनीची सायबर गुन्हेगारांनी तब्बल 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुना गली परिसरात राहणारी साक्षी कुमारी ही विद्यार्थिनी ऑनलाईन फसवणुकीला बळी ठरली आहे.
साक्षीने गेल्या आठवड्यात 510 रुपयांना ऑनलाईन ड्रेस खरेदी केला. "मी ऑनलाईन खरेदी करताच, माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि दुसऱ्याच दिवशी सायबर गुन्हेगारांनी लकी ड्रॉमध्ये प्रथम पारितोषिक जिंकल्याची म्हणजेच 12 लाख 60 हजार रुपये रोख किंवा टाटा सफारी कार जिंकल्याची माहिती दिली. कॉल करणाऱ्यांनी स्वतःला मीशो कंपनीचे अधिकारी आहोत अस सांगितलं. तसेच कंपनीचं ओळखपत्र व आधारकार्ड पाठवलं आणि फसवणुकीची सुरुवात झाली" असं तिने म्हटलं आहे.
सायबर गुन्हेगारांनी दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीला फोन करून लकी ड्रॉमध्ये मिळालेले बक्षीस मिळवण्यासाठी फॉर्म चार्ज, जीएसटी, इन्कम टॅक्स, सिक्योरिटी चार्ज, टीडीएस चार्जेस जोडून खात्यात तीन लाख रुपये मागितले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर सायबर गुन्हेगारांचा कॉल येणं बंद झालं आणि मोबाईल क्रमांकही बंद झाला. तीन लाख रुपये गमावल्यानंतर विद्यार्थिनीलाही आपली फसवणूक झाल्याचं समजलं.
विद्यार्थिनीने या संपूर्ण प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. एसडीपीओ संजीव कुमार म्हणाले की, बहुसंख्य शिक्षित लोक बक्षीस मिळवण्याच्या लोभापायी सायबर गुन्हेगारांचे बळी ठरत आहेत. अशा प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवून सायबर सेलच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्याची कारवाई केली जात आहे. गोपालगंजच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांवर नजर टाकली तर गेल्या सहा महिन्यांत 45 गुन्हे दाखल झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"