नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. एका लग्नात माशाचा आवडता तुकडा न मिळाल्याने जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. जेवणात माशाचे डोके न मिळाल्याने खूप वाद झाला. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि यामध्ये तब्बल 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. बिहारच्या (Bihar) गोपालगंजमधील भोरे क्षेत्रातील भटवलिया गावातील आहे. लग्न मंडपात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भटवलिया गावात एका लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान जेवणात आवडता पिस म्हणजेच माशाचे डोके न मिळाल्याने ही हाणामारी झाली. ही घटना सिसई टोला भटवालिया गावची आहे. लग्नसोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये माशाच्य़ा आवडत्या पिसवरून वाद झाला होता. हा वाद एका माशाचा पिससाठी पुढे विकोपाला गेला. थेट हाणामारी सुरू झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे 11 लोक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुदामा गोंड नावाच्या एक व्यक्तीने आरोप केला, की त्यांचे नातेवाईक असलेल्या धन्नु गोंड यांच्याकडे मुलीची वरात आली होती. यात त्याच गावातील रहिवाशी असलेले हीरा गोंडदेखील आले होते. जेवण करताना त्यांनी जास्त पीस आणि माशाचं डोकं देण्याची मागणी केली. मात्र, हे आणण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे, हीरा गोंड यांनी मासे वाढणाऱ्या सुदामा गोंड याला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यात काठी आणि लोखंडी रॉड घेऊन अजय गोंड, राजा गोंड यांच्यासह पाच लोक त्याठिकाणी आले आणि सुदामा गोंड, त्यांचा मुलगा मुन्ना गोंड आणि सून रीना देवी यांना मारहाण करू लागले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वऱ्हाड्यांना जेवणात मासे आणि भात देण्यात आला होता. त्याचवेळी काही वऱ्हाडी माशाचं डोके वाढण्याची मागणी करत होते. मात्र संपल्यामुळे त्यांना वाढता आले नाही. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी चांगलीच संतापली. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाद-विवाद झाले. त्यानंतर लवकरच हा वाद-विवाद हाणामारीत बदलला. लग्नाच्या कार्यक्रमात खुर्च्या फेकल्या जाऊ लागल्या. या हाणामारीत 11 लोक जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.