नवी मुंबई : गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरावर हल्लाप्रकरणी अटकेत असलेला अहमद मुर्तजा अब्बासी याने वास्तव्य केलेल्या ठिकाणांच्या शोधात मुंबई एटीएसने सानपाडा परिसराची झाडाझडती घेतली. अब्बासी याने त्याच्या पूर्वी वास्तव्य केलेल्या ठिकाणांमध्ये मुंबई मिलेनियम असा उल्लेख केला आहे. त्यावरून सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमध्ये एटीएसमार्फत चौकशी करण्यात आली. मात्र या नावाची व्यक्ती त्याठिकाणी वास्तव्याला नव्हती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
रविवारी रात्री गोरखनाथ मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने मंदिरात जबरदस्ती घुसण्यासाठी तिथल्या सुरक्षारक्षक व पोलिसांवर हल्ला केला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून चौकशीत अहमद मुर्तजा अब्बासी असे त्याचे नाव समोर आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. यासाठी त्याची पार्श्वभूमी तपासली जात आहे. तो मूळचा गोरखपूरचा राहणारा असून त्याने मुंबई आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरची शिक्षण घेतले आहे. यादरम्यान त्याने कुठे कुठे वास्तव्य केले याचा शोध घेतला जात आहे. त्यामध्ये २०१३ मध्ये त्याने मिलेनियम मुंबई येथे वास्तव्य केल्याचे सांगितले आहे. त्यावरून मुंबई एटीएसने सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमध्ये त्याच्याविषयी चौकशी केली. मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या नावाची व्यक्ती त्याठिकाणी वास्तव्याला नव्हती. यामुळे त्याठिकाणी एटीएसच्या हाती काही लागले नाही. परंतु यापूर्वी देखील ही सोसायटी चर्चेत आलेली असल्याने परिसरात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले होते.