उत्तर प्रदेशमधील गोरखनाथ मंदिराच्या बाहेर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर हल्ला करणारा अहमद मुर्तजा अब्बासीचे दहशतवादी कनेक्शन शोधण्यासाठी उत्तर प्रदेश एटीएस टिम नेपाळला रवाना झाल्या आहेत. मुर्तजा हा वादग्रस्त झाकिर नाईकचे व्हिडीओ बघायचा, असं तपासात निष्पन्न झालं आहे.
मुर्तजाचे रॅडीकलायजेशन (कट्टरपंथीय विचारांचा प्रभाव) केले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पोलीस मुर्तजाशी संबंधित सर्व व्यक्तींवर नजर ठेऊन आहे. मुर्तजाच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच दोघांनी हल्ल्याच्या दिवशी मुर्तजाला मंदिराजवळ सोडल्याचं तपासात समोर आलं आहे. सध्या गोरखपुरच्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात येत आहे. यात कुशीनगर आणि संत कबीरनगर येथून दोन जणांना अटक करण्यात आली.
मुर्तजा गोरखनाथ मंदिरापर्यंत कसा पोहोचला होता, त्याच्याबरोबर नेमंकं कोण होत?, त्याच्याकडे शस्त्र कशी आली, अशा दिशेने तपास करण्यात येत आहे. गेल्या वर्षी अंसार- गजवा -तुलच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यातील एका जवळून प्रेशर बॉम्ब जप्त करण्यात आला होता, याच्याशी काही कनेक्शन आहेत का, याचाही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान मुर्तजाची माहिती समोर आली आहे. तो गोरखपुर येथील सिविल लाईनचा रहिवाशी असून अहमद मुर्तझा अब्बासी यांनी २०१५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१५ मध्ये इंजिनिअरिंगमधून उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आणि नंतर एस्सार पेट्रोकेमिकल्समध्ये नोकरी केली. त्याचे लग्न झालेले असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अहमद मुर्तझा अब्बासी याच्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केले असून, तो मुंबईत राहत होता. मुर्तझा अब्बासी याच्यावर अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून अहमद मुर्तझा अब्बासी याच्या मित्रांच्या भेटीगाठीही कमी झाल्या होत्या.