सातारा : थायलंडचं तिकीटही मिळालं. ट्रिपला जाण्याच्या आनंदात चार मित्र साताऱ्यातून मुंबईच्या विमानतळावर पोहोचले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिक्षित असतानाही आपली फसगत झाल्याचे शल्य त्यांना सतावतेय. सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्तीने थायलंड ट्रिपचे तिकीट देतो, असे सांगून साताऱ्यातील चार तरुणांना तब्बल ३ लाख २५ हजारांचा गंडा घातलाय. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूपिंदर सिंग (रा. बलदेवनगर, अंबाला सिटी, हरयाणा), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील ३३ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावरील एका साईटवरून मोबाइल खरेदी केला. त्यावेळी भूपिंदर सिंग या नावाच्या व्यक्तीशी त्या तरुणाशी ओळख झाली. या ओळखीतून त्यांचे संभाषण वाढले. थायलंड फुकेत येथे ट्रिपला जाण्यासाठी तुम्हाला तिकीट देतो, असा विश्वास सिंगने संपादन केला. आम्ही चार मित्र असून, या चाैघांचे मिळून पैसे पाठवतो, असे साताऱ्यातील त्या तरुणाने त्याला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून साताऱ्यातील तरुणाने भूपिंदर सिंग याच्या कोटक महिंद्रा बॅंकेच्या अकाउंटवर वेळोवेळी ३ लाख २५ हजार रुपये पाठविले.
काही दिवसांनंतर ईमेल आयडीवर सिंग याने फुकेत थायलंडचे तिकीट पाठवले. ठरल्याप्रमाणे चार मित्र थायलंडला जाण्यासाठी साताऱ्यातून मुंबईला रवाना झाले. मुंबईतील विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना तिकीट बुक नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सिंग याला फोन करून सांगितले. तेव्हा त्याने थोडा प्रॉब्लेम झाला असून, दोन दिवस थांबा दुसरे तिकीट पाठवतो, असे सांगितले. सिंगचे ऐकून हे चार मित्र मुंबईत दोन दिवस थांबले. मात्र, सिंगचा ना फोन ना कसलाही संपर्क पुन्हा झालाच नाही. उलट त्याने साताऱ्यातील या चौघा मित्रांचे नंबर ब्लॉकलिस्टला टाकले.
तेव्हा या चौघांच्या पायाखालची वाळू सरकली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सर्वजण नाराज झाले. थायलंडच्या ट्रिपसाठी आनंदात विमानतळावर गेलेले चार मित्र हिरमसुल्या चेहऱ्याने पुन्हा साताऱ्यात आले. आपण शिक्षित आहोत, असे असतानाही आपण फसलो गेलो, याचे शल्य त्यांच्या मनात आहे. परंतु इतर कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाचा हवालदार राहुल गायकवाड हे पुढील तपास करतायत.
तिकीट खरं पण तरीसुद्धा..भूपिंदर सिंग याने पाठवलेले विमानाचे तिकीट खरे होते. त्यामुळे या चार मित्रांना त्याच्यावर विश्वास बसला. परंतु मुंबईला जाईपर्यंत त्यांचे तिकीट त्याने रद्द करून वेगळाच डाव खेळला. यामध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा आता पोलिस तपास करत आहेत.