लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी व गोपनीय माहिती फोडल्याबद्दल ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुरावे नाहीत, अशी माहिती शुक्ला यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी उच्च न्यायालयाला शनिवारी दिली.
फोन टॅपिंग व गोपनीय माहिती फोडल्याबद्दल मुंबई सायबर सेलने अज्ञात लोकांविरोधात गुन्हा नोंदविला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकार वाईट हेतूने कारवाई करत आहे, असे जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले. एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे शुक्ला यांनी कोणताही गुन्हा केला नाही. जरी असे गृहीत धरले की शुक्ला यांनी गुन्हा केला तरी त्यात जनहित आहे, असे जेठमलानी यांनी म्हणाले.
शुक्ला यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. शुक्ला यांनी जनहिताचे काम केले आहे, तर याप्रकरणी गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यापेक्षा त्यांनी याची चौकशी करण्याचा आग्रह केला पाहिजे, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयात केला. राज्य सरकारने शुक्ला यांच्या याचिकेत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने न्यायालयाने सरकारला ४ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
पोलीस नियुक्त्या व बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारासंबंधी अहवाल सादर केल्याने राज्य सरकार शुक्ला यांना लक्ष्य करत आहे आणि बळीचा बकरा बनवत आहे, असा युक्तिवाद शुक्रवारच्या सुनावणीत जेठमलानी यांनी केला.