म्हापसा - राज्यातील अमली पदार्थाच्याव्यवसायावर विदेशींचे खास करून नायजेरियन नागरिकांचे वर्चस्व असल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात यात गुंतलेल्या गोवेकरांचे प्रमाण जास्त असल्याचे उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी त्यात सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुर्वी किनारी किंवा शहरी भागा पुरता मर्यादित असलेला हा ड्रग्सचा व्यवसाय आता गावा गावातही पोहोचला आहे. त्यामुळे गावातही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. या वर्षी पहिल्या ९ महिन्यांत पोलिसांकडूनअमली पदार्थ विरोधी गुन्ह्याखाली सुमारे १६६ गुन्ह्यांची नोंद केली आहे. नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांत १८२ संशयितांना अटक करण्यात आली. त्यातील ६५ गोवेकर असून ८१ इतर राज्यातील तर फक्त ३६ विदेशी नागरिकांचा त्यात समावेश होतो. एकूण अटक करण्यात आलेल्यात गोवकरांचे प्रमाण ३० टक्क्यांहून जास्त म्हणजे ३६ टक्के आहे. या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांत अटक करण्यात आलेल्या गोवेकरांचे प्रमाण फक्त २३ टक्के होते; पण त्यानंतर मात्र मागील चार महिन्यांत त्यात बरीच वाढ झाली होती. अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकात १७ नायजेरियन, १५ रशियन, ३ केनिया देशातील तर प्रत्येकी १ इटली व नेपाळ देशातील आहेत.
गेल्या वर्षी याच प्रमाणात पोलिसांकडून २२१ गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्यात २३३ जणांना अटक झाली होती. यातील गोवेकरांचे प्रमाण फक्त २७ टक्के होते. एकंदरीत ६३ गोवेकरांवर, १२० देशातील अन्य राज्यांतल्या नागरिकावर तर फक्त ४९ विदेशी नागरिकांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले.या वर्षी नोंद केलेल्या विविध गुन्ह्यांत ४९ किलोग्रामचा १ कोटी ८४ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अमली पदार्थात सर्वात जास्त प्रमाण चरसचे आहे. सुमारे ४२ किलो चरस ताब्यात घेण्यात आला. तसेच गांजा, एमडीएमए, एलएसडी पेपर्स, कोकेन, मारीजुआना, हेरोईन सारख्या पदार्थाचा समावेश होतो.
मागील काही महिन्यापासून पोलिसांच्यावतीने या व्यवसायात गुंतलेल्यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. सदरची मोहीम हाती घेताना ज्यांच्या विरोधात गुन्हे नोंद झाले आहेत किंवा न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहेत असेही आरोपी पोलिसांच्या निगराणीखाली आहेत. पर्यटन हंगामा सुरू होण्यापूर्वी अमली पदार्थाच्या पसारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहिम हाती घेतली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.